मनपा बजेटमध्ये मागासवर्गीय आणि दिव्यांगांच्या निधीवर डल्ला... महासभेत पुराव्यासह गौप्यस्फोट...

Share:
Last updated: 30-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी ) ३० मार्च   -  महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी असलेल्या निधीत कपात करण्यात आली तर मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासासाठी राखीव केलेल्या निधीवर डल्ला मारुन प्रभाग क्र. २५ मधील रस्त्यांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी महासभेत केला. "प्रशासनाने गरिबांच्या आणि दिव्यांगांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारून विशिष्ट प्रभागांचे लाड पुरवले आहेत," असे म्हणत त्यांनी सभागृहात आकडेवारीचा पाढाच वाचला. स्थायी समितीने प्रस्तावित केलेला १३३ कोटींचा निधीतील ६० टक्के निधी केवळ ०६ प्रभागांना वाटून घेतल्याचा पुरावाच त्यांनी सभागृहात मांडला. 

मागासवर्गीय वस्त्यांचा ८ कोटींचा निधी रस्त्यांसाठी वळवला - 
तिदमे यांनी पुराव्यानिशी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासासाठी स्थायी समितीने जो राखीव निधी ठेवला आहे, त्यातील ८ कोटी रुपये प्रभाग २५ मधील रस्त्यांच्या कामांसाठी वळवण्यात आले आहेत. मागासवर्गीय बांधवांसाठी कल्याणकारी योजना, कौशल्य विकास आणि शिष्यवृत्तीसाठी मागच्या वर्षी ५ कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले आणि यावर्षी या निधीत कपात करुन केवळ २ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. "ज्या निधीवर मागासवर्गीय वस्त्यांचा अधिकार होता, तो पैसा केवळ राजकीय सोयीसाठी वापरणे हा सामाजिक अन्यायच आहे," अशी तोफ तिदमे यांनी डागली.
दिव्यांग बांधवांच्या निधीला कात्री - 
दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी मागच्या वर्षी ३१ कोटी रुपये खर्च केल्याचे अंदाजपत्रकच सांगत आहे. यावर्षी मात्र त्यात कपात करून २५ कोटी ६६ लाखांचीच तरतूद आहे. दिव्यांग बांधवांसाठी क्रीडा व अन्य स्पर्धा घेण्यासाठी मागच्या वर्षी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आणि यावर्षी त्यात कपात करुन केवळ १५ लाख रुपये तरतूद केली आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठीचा निधी कपात करुन आपल्या मर्जीतल्या प्रभागांत रस्ते बांधण्यासाठी वळविण्यात आल्याचा आरोप ही तिदमे यांनी केला.

•    महापालिकेच्या मिळकतींच्या हाऊस किपींगसाठी खर्चात ३६१ % ने वाढ प्रशासनाने सुचवून १३ लाखांचा खर्च ६० रुपयांवर नेला आहे.
•    शहरातील उद्यानांची दुरावस्था बघता उद्यान देखभालीसाठी भरीव तरतूद करण्याऐवजी देखभाल खर्चात ३२ % ने कपात करण्यात आली आहे. १० कोटींवरून ७ कोटींवर निधी आणला आहे.
•    जंतू नाशक खरेदीसाठी १०० % ने वाढ करून २० लाखावरून निधी ४० लाखांवर खर्च नेण्यात आला आहे.
•    झाडू, पाट्या, फावडे व उंदीर पिंजरे इ. खरेदीसाठी १५० % ने वाढ करुन २० लाखांवरून निधी ५० लाखांवर नेण्यात आला आहे.
•    पाणी पुरवठा खर्चाचे गूढ: पाणी पुरवठा विभागाचा आस्थापना खर्च पान १०० ते १४७ मध्ये स्पष्टपणे दिसत नसल्याने, हा कोट्यवधींचा खर्च नक्की कुठे लपवला आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Advertisement

स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील आकडेवारी:
•    भेदभावपूर्ण निधी वाटप: स्थायी समितीने १३३ कोटी ६६ लाखांच्या विशेष निधीपैकी
•    सर्वाधिक १३३ कोटीतील सुमारे ६० टक्के निधी केवळ ०६ (सहाच) प्रभागांनाच दिला आहे.
•    हा निधी प्रभागांना न देता विशिष्ट नगरसेवकांनाच देण्यात आला आहे. 
•    प्रभाग क्रमांक ०३ साठी २६ कोटी ६६ लाख रुपये 
•    प्रभाग क्रमांक २५ साठी २० कोटी ७५ लाख रुपये 
•    प्रभाग क्रमांक ३० साठी १० कोटी ४० लाख रुपये
•    तर प्रभाग १४, १५, २६ आणि २८ यांना शून्य (०) रुपये निधी देऊन वाऱ्यावर सोडले आहे.

प्रभाग २४ ची 'क्रूर थट्टा'
•    आपल्या प्रभागातील व्यथा मांडताना तिदमे म्हणाले की, प्रभाग २४ मध्ये ड्रेनेज आणि पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत. अधिकाऱ्यांच्या मते या कामासाठी मलनिस्सारणसाठी १० कोटींची गरज असताना अंदाजपत्रकात मलनिस्सारणसाठी केवळ ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ही प्रभाग २४ मधील जनतेची क्रूर थट्टा असल्याचे त्यांनी संतापून सांगितले.

बंटी तिदमे यांच्या प्रमुख मागण्या:
१. मागासवर्गीय वस्त्यांचा वळवलेला ०८ कोटींचा निधी त्वरित मागासवर्गीय वस्त्यांचा विकासासाठी वर्ग करावा. 
२. दिव्यांग बांधवांच्या निधीतील कपात रद्द करावी. 
३. जोपर्यंत प्रभाग २४ चा पाणी आणि ड्रेनेज प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत या भागातील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करू नये. 
४. १३३ कोटी ६६ लाखांच्या विशेष तरतुदीचे सर्व १२२ सदस्यांच्या प्रभागात समसमान वाटप करावे.

अंदाजपत्रकातील या चुका दुरुस्त न झाल्यास वंचित घटकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा प्रविण तिदमे यांनी यावेळी दिला.

Comments

No comments yet.