नाशिक, (प्रतिनिधी) ३० मार्च - शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.२९) वेगवेगळ््या भागात राहणाऱ्या दोन तरूणींनी आत्महत्या केली. त्यातील एकीने विषारी औषध तर दुसरीने अती प्रमाणात औषधी गोळ्यांचे सेवन करून आपले जीवन संपविले. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. साक्षी चंद्रशेखर झरे (२२ रा.रायगड चौक, सिडको) या तरूणीने गेल्या मंगळवारी (दि.१७) अज्ञात कारणातून मोठ्या प्रमाणात औषधी गोळ््यांचे सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते.
गेले बारा दिवस तिच्यावर उपचार सुरू असतांना रविवारी डॉ. विरेंद्र जाधव यांनी तिला तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार बनतोडे करीत आहेत.
दुसरी घटना सिन्नर फाटा भागात घडली. ज्योती रामदास चव्हाण (१९ रा. पाम रेसि. सोनवणे मळा सिन्नरफाटा) या युवतीने गेल्या गुरूवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी झुरळ मारण्याचे औषध सेवन केले होते.
कुटूंबियांनी तिला बिटको व मॅग्नम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना डॉ. यश जाधव यांनी तिला तपासून मृत घोषीत केले.
याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार अनिल पवार तपास करीत आहेत.
छतावरून पडल्याने एक ठार
नाशिक : छतावरून पडल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलेस रमेश पाटील (रा. साईलिला साईग्राम सोसा.उपेंद्रनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाटील रविवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीच्या छतावर फेरफटका मारत असतांना ही घटना घडली.
अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार देशमुख तपास करीत आहेत.