नाशिक, (प्रतिनिधी) ३० मार्च - शहरातील सिडको परिसरातील कामटवाडा भागात शनिवारी रात्री एका धक्कादायक घटनेत कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दोन मित्रांना काही तरुणांच्या टोळक्याने विनाकारण अडवून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या खांद्याला मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी योगेश पुंडलीक चारोस्कर (रा. इंदिरानगर, एकलहरे गाव) आणि त्यांचे मित्र चंद्रकांत देवजी उल्हाटे हे दोघे शनिवारी (दि. २८) रात्री कामटवाडा गावात कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. स्थानिक नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्या घरी महाप्रसाद घेऊन हे दोन्ही मित्र हनुमान मंदिराच्या दिशेने पायी जात होते.
रात्रीच्या सुमारास स्मशानभूमी रस्त्यावर दबा धरून बसलेल्या संशयितांनी या दोघांची वाट अडवली. कुठलेही जुने भांडण किंवा कारण नसताना संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
चौघांवर गुन्हे दाखल
या मारहाण प्रकरणी योगेश चारोस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
शरद थोरात (ठोलवाला)
शुभम कांबळे
चंद्रकांत कोळी
रोहन पवार
या मारहाणीत योगेश चारोस्कर यांच्या खांद्याला गंभीर इजा झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार टोपले करत आहेत. सिडको परिसरात गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मारहाण करून लुटले
नाशिक : दुचाकीस्वारास मारहाण करीत त्रिकुटाने लुटल्याची घटना महामार्गावरील वर्दळीच्या गोविंदनगर चौकात घडली. या घटनेत दुचाकीस्वाराची अंगझडती घेत भामट्यांनी मोबाईल पळविला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने सिडकोतील किरण प्रकाश चवडे (रा.वंदे मातरम चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चवडे शनिवारी (दि.२८) मित्रास सोडण्यासाठी गोविंदनगर भागात गेले होते. मित्रास सोडून ते दुचाकीवर घराकडे परतत असतांना ही घटना घडली. चौकातील विश्वास बँक भागात समोरून ट्रिपलसिट आलेल्या पल्सरस्वारांनी त्यांची वाट अडविली. कुठलेही कारण नसतांना संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत भामट्यांनी त्यांची अंगझडती घेत खिशातील सुमारे २० हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून उपनिरीक्षक बेग तपास करीत आहेत.