ठाणे, (प्रतिनिधी) ३० मार्च - ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीच्या मनमानी कारभाराला आणि निकृष्ट सेवेला ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जोरदार चपराक लगावली आहे. एका ग्राहकाला सदोष ई-स्कूटर विकल्याप्रकरणी आयोगाने कंपनीला कठोर आदेश दिले आहेत. संबंधित ग्राहकाला एकतर नवीन कोरी स्कूटर द्या किंवा खरेदीची पूर्ण रक्कम ९६,९९७ रुपये ६ टक्के व्याजासह परत करा, असे आदेशात म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
नवी मुंबईतील एका वकिलाने जुलै २०२४ मध्ये ओला इलेक्ट्रिकची स्कूटर ९६,९९७ रुपयांना खरेदी केली होती. मात्र, डिलिव्हरी मिळाल्यापासून अवघ्या दोन दिवसांतच स्कूटरमध्ये तांत्रिक बिघाड सुरू झाले. चालवताना अचानक वेग (Acceleration) कमी-जास्त होणे आणि गर्दीच्या ठिकाणी गाडी वारंवार बंद पडणे, अशा समस्यांमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, ऑगस्ट २०२४ मध्ये एका प्रवासादरम्यान बॅटरीची टक्केवारी अवघ्या ५०० मीटरच्या अंतरात २१ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांवर आली, ज्यामुळे गाडी रस्त्यातच बंद पडली. या तांत्रिक बिघाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती, असा दावा तक्रारदाराने केला होता.
आयोगाचे ताशेरे आणि दंड
वारंवार तक्रार करूनही कंपनीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ग्राहकाने ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. या प्रकरणाची दखल घेत आयोगाने खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत:
परतावा/बदली: कंपनीने ग्राहकाला त्याच मॉडेलची नवीन स्कूटर द्यावी. ते शक्य नसल्यास ९६,९९७ रुपये ६% वार्षिक व्याजासह परत करावेत.
मानसिक त्रास: ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल २०,००० रुपये नुकसान भरपाई द्यावी.
खटला खर्च: कायदेशीर लढाईसाठी आलेला १५,००० रुपये खर्चही कंपनीने सोसावा.
आयोगाचे निरीक्षण: "गाडी घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच बॅटरी उतरणे आणि तांत्रिक बिघाड होणे, हे वाहन सदोष असल्याचे लक्षण आहे. ग्राहकाला योग्य सेवा न देणे आणि माहिती लपवणे ही सेवांमधील कमतरता (Deficiency in Service) असून ही अनुचित व्यापारी प्रथा आहे."
कंपनीची बाजू अनुपस्थित
विशेष म्हणजे, या प्रकरणात ओला इलेक्ट्रिक कंपनीला नोटीस बजावूनही त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी कोणतेही लेखी पत्र सादर केले नाही किंवा आयोगासमोर हजेरी लावली नाही. त्यामुळे आयोगाने हा निकाल 'एकतर्फी' (Ex-parte) जाहीर केला आहे.