मुंबई, (प्रतिनिधी) २९ मार्च - अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विशेष तपास पथकाने (SIT) समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
अशोक खरात याने 'श्री शिवनिका संस्थान'च्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या संस्थेमध्ये रुपाली चाकणकर या विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. एका भोंदूबाबाच्या संस्थेत महत्त्वाच्या पदावर असताना चाकणकर यांची भूमिका काय होती आणि त्यांना या गैरप्रकारांची कल्पना होती का? यावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सुषमा अंधारेंचा घणाघात
गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे या प्रकरणाचा पाठपुरावा करत होत्या. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटले की,
"अखेर एसआयटीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही."
अंधारे यांनी यापूर्वीही चाकणकर यांच्यावर या प्रकरणात मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. आता प्रत्यक्ष समन्स बजावण्यात आल्याने चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
तपासाची चक्रे फिरली
भोंदूगिरी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारींनंतर स्थापन करण्यात आलेल्या 'एसआयटी'ने आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि विश्वस्तांच्या सहभागाची चौकशी सुरू केली आहे. चाकणकर यांना पाचारण केल्यानंतर त्यांची चौकशी कधी होणार आणि त्या काय जबाब नोंदवतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.