नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २८ मार्च - स्वतःला 'दैवी अवतार' म्हणवून घेणाऱ्या आणि संकटात सापडलेल्यांना मदतीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे थांबता थांबत नाहीत. कौटुंबिक कलह मिटवण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेवर गुंगीचे पाणी पाजून बलात्कार केल्याचा आणि एका कापड व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या आता दहावर पोहोचली आहे.
कौटुंबिक कलह मिटवण्याच्या नावाखाली अत्याचार
अहिल्यानगर येथील एका दांपत्याचा २०१३ मध्ये विवाह झाला होता, मात्र त्यांच्यात सतत वाद होत होते. एका ओळखीच्या व्यक्तीने सल्ला दिल्यानंतर हे दांपत्य २०२२ मध्ये नाशिकमधील खरातच्या कार्यालयात आले. खरातने काही ज्योतिषीय उपाय सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. ऑगस्ट २०२४ मध्ये हे दांपत्य पुन्हा शेतीतील भरभराटीसाठी खरातकडे आले असता, त्याने पतीला केबिनबाहेर बसवले. त्यानंतर पीडित विवाहितेला तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला दिले. हे पाणी प्यायल्यानंतर महिलेवर त्याने अत्याचार केला. "मी महादेवाचा अवतार आहे, कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांना संपवून टाकेन," अशी धमकीही त्याने दिली. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ या काळात त्याने चार वेळा पीडितेवर बळजबरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
व्यापाऱ्याची सोन्याच्या अंगठ्यांसह फसवणूक
दुसऱ्या घटनेत, नेवासा येथील एका कापड व्यापाऱ्याला व्यवसायात वृद्धी करण्याचे आमिष दाखवून खरातने लुटले. व्यापाऱ्याला अंगठ्यांमध्ये पुष्कराज आणि हिरा बसवण्याचा सल्ला देऊन, खरातने त्याच्याकडून २० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या घेतल्या. या बदल्यात २ लाख ६० हजारांचा ऐवज उकळला. खरातच्या अटकेनंतर व्यापाऱ्याने आपल्या अंगठ्यांची तपासणी केली असता, त्यातील हिरे आणि खडे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्ह्यांचे 'दशक' पूर्ण
अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे ८ गुन्हे हे महिलांवरील अत्याचाराचे असून २ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. राजेंद्र जासूद आणि राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी दिल्या आहेत.
पोलिसांचे आवाहन: अशोक खरात याच्याकडून अशाच प्रकारे फसवणूक किंवा अत्याचार झाले असल्यास नागरिकांनी न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.