'नकली पोलीस' आणि 'भामट्या महिला' सक्रिय... नाशिकरोडला पावणेतीन लाखांचे दागिने लंपास...

Share:
Main Image
Last updated: 28-Mar-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २८ मार्च - नाशिकरोड परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, फसवणुकीच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. लॅमरोड परिसरात 'नकली पोलीस' बनून दोन वृद्ध महिलांना लुटण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत रिक्षा प्रवासादरम्यान एका महिलेच्या दागिन्यांवर चोरट्या महिलांनी डल्ला मारला. या दोन्ही प्रकरणांत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटना १: 'पोलीस' असल्याचा बनाव अन् २ लाखांचे दागिने गायब
लॅमरोडवरील सौभाग्यनगर भागात मंगळवारी (दि. १७) सायंकाळी ही घटना घडली. मंदा तुकाराम कोटकर (८०) आणि त्यांच्या मैत्रीण प्रेमलता बर्डे या दोघी परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. नाना-नाणी पार्क परिसरातील निकुंज बंगल्यासमोर दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना अडवले.
"आम्ही पोलीस आहोत, पुढे एका महिलेवर चाकू हल्ला झाला आहे, तुम्ही तुमचे दागिने काढून सुरक्षित ठेवा," असा बनाव या भामट्यांनी रचला. मदतीचा बहाणा करत या चोरट्यांनी दोन्ही महिलांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि मंगळसूत्र असा सुमारे २ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज हातोहात लांबविला. हवालदार टेमकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

घटना २: रिक्षा प्रवासात सहप्रवासी महिलांनीच साफ केला हात
दुसरी घटना नाशिकरोडच्या डीजीपी नगर भागात घडली. मिराबाई अंबादास घुगे (रा. चेहडी शिव) या गुरुवारी (दि. २६) सकाळी नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी रिक्षामध्ये दोन महिला सहप्रवासी असलेल्या रिक्षेत प्रवेश केला. प्रवासादरम्यान या भामट्या महिलांनी घुगे यांचे लक्ष विचलित केले आणि रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगेतील मिनी पाकीट चोरले.

या पाकिटात अडीच हजारांची रोकड आणि सोन्याचे मंगळसूत्र असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल होता. खाली उतरल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर घुगे यांनी पोलिसांत धाव घेतली. हवालदार पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा:
रस्त्याने जाताना कोणी 'पोलीस' असल्याचे सांगून दागिने काढायला लावत असेल, तर सावध राहा. खरे पोलीस कधीही दागिने काढायला सांगत नाहीत.
रिक्षा किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना आपल्या बॅगेवर आणि मौल्यवान वस्तूंकडे विशेष लक्ष द्या.
संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधा.

Comments

No comments yet.