नाशिक, (प्रतिनिधी) २८ मार्च - शहरातील उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या पंडित कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि. २७) 'कोयता गँग'ने दहशत माजवत एका हॉटेलची तोडफोड केली. हातात धारदार शस्त्रे नाचवत आलेल्या टोळक्याने हप्त्याची मागणी करत दोन चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
शरणपूर रोडवरील न्यू पंडित कॉलनीतील लेन नंबर ३ मध्ये संतोष ठाकूरदास कुकरेजा यांचे 'शिबा स्नॅक्स' नावाचे हॉटेल आहे. शुक्रवारी दुपारी कुकरेजा आपल्या हॉटेलमध्ये असताना संशयित टोळक्याने हातात कोयते घेऊन प्रवेश केला. "हा एरिया आमच्या गँगचा आहे, इथे व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल," अशी धमकी संशयितांनी दिली. कुकरेजा यांनी पैसे देण्यास नकार देताच संतप्त झालेल्या टोळक्याने हॉटेलमधील सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
वाहनांच्या काचा फोडल्या
हॉटेलमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर या टोळक्याने आपला मोर्चा बाहेर उभ्या असलेल्या वाहनांकडे वळवला. यावेळी परिसरातील MH 02 BP 2618 आणि MH 15 DS 3301 या दोन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले. "जो हप्ता देणार नाही, त्याचा गेम करू," अशी उघड धमकी देत हे टोळके पसार झाले. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मोठी पळापळ झाली.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
संतोष कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
प्रतिक सुदर्शन सोनार
अल्पेश रॉबर्ट म्हस्के
रोशन अमोल खिराळे
करण शेखरे
पराग जाधव
आदित्य तायडे, तन्मय, दुर्गेश व इतर साथीदार.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. "लवकरच सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या जातील," असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.