नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) २८ मार्च - देशातील रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांच्या ‘उन्हाळी अंतर्वासिता कार्यक्रमा’ची (Summer Internship Program 2026) घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार असून, त्यांना दरमहा २० हजार रुपये मानधनही दिले जाणार आहे.
अभियांत्रिकीसह इतर शाखांनाही संधी
NHAI ने यावेळेस आपल्या इंटर्नशिप कार्यक्रमाचा विस्तार केला आहे. यात केवळ स्थापत्य (Civil) अभियांत्रिकीच नाही, तर माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन अशा विविध तांत्रिक शाखांचा समावेश करण्यात आला आहे.
तांत्रिक क्षेत्राव्यतिरिक्त विधी (Law), वाणिज्य (Commerce), विज्ञान, व्यवस्थापन (MBA- HR, Finance, Marketing), जनसंवाद (Mass Communication) आणि ग्रंथालय शास्त्र यांसारख्या अतांत्रिक शाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होता येईल.
महत्त्वाच्या तारखा आणि कालावधी:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ एप्रिल २०२६
इंटर्नशिपचा कालावधी: ४ मे ते ५ जुलै २०२६ (दोन महिने)
अर्ज कोठे करावा: https://internshipsatnhai.digitalindiacorporation.in/
अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्लीतील NHAI मुख्यालय किंवा देशातील विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियुक्त केले जाईल. तिथे त्यांना अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 'प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र' दिले जाईल.
कोण पात्र आहे?
'राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्या'अंतर्गत (NIRF) अव्वल दर्जाच्या संस्था, नामांकित विधी विद्यापीठे, व्यवस्थापन संस्था आणि प्रतिष्ठित जनसंवाद संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षण घेणारे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी या कार्यक्रमासाठी पात्र आहेत.