'खरात प्रकरणा'चा फेरा...  रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...

Share:
Main Image
Last updated: 28-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ मार्च - गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या 'खरात प्रकरणा'चे पडसाद अखेर उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. आता त्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून उतार झाल्या आहेत.

तपासात अडथळा नको; चाकणकरांची भूमिका
राजीनामा देताना रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू अत्यंत ठामपणे मांडली आहे. "खरात प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात माझा सहभाग नाही, ही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे," असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे व्हावा, यासाठीच आपण पदाचा त्याग करत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Advertisement

नेमके कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून होत असलेल्या आरोपांमुळे आपण व्यथित झाल्याचे चाकणकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या:
"खोटे, असत्य आणि कोणताही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून केले जात आहेत, ते वेदनादायक आहेत. पण मला खात्री आहे की सत्य लवकरच प्रखरतेने समोर येईल."
या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांची भेट घेऊन मागणी केली होती.

सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
विशेष म्हणजे, हा राजीनामा देण्यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतरच त्यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, आता महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.