कांदा प्रश्नी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दिल्लीत... केली ही मागणी...

Share:
Main Image
Last updated: 27-Mar-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २७ मार्च - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील प्रगती, प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कृषी मंत्री भरणे यांनी राज्यातील कृषी यांत्रिकीकरण आणि ठिबक सिंचन योजनांना गती देण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.तसेच

कोकण आणि किनारपट्टीच्या भागात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती भरणे यांनी दिली. या नुकसानीची केंद्र सरकारच्या पथकाने  पाहणी केली असल्याचे कृषी मंत्रालयाने सांगितले.

Advertisement

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'पंतप्रधान पीक विमा योजनेचा' जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या जलद निवारणासाठी ५२ विशेष पथके स्थापन करण्यात आली असून त्यांच्या कामाचा नियमित आढावा घेतला जात आहे. तसेच राज्याने 'राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा'  पूर्ण लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कांदा खरेदीबाबत आश्वासन

राज्यात यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी (APMC) मार्फत थेट कांदा खरेदीची व्यवस्था करण्याची मागणी महाराष्ट्राने केली. या मागणीवर सकारात्मक विचार करून योग्य पावले उचलण्याचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले. या बैठकीमुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कृषी धोरणांच्या अंमलबजावणीसाठी अधिक समन्वय निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Comments

No comments yet.