नाशिक, (प्रतिनिधी) २७ मार्च - कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे एकामागून एक पदर उलगडू लागले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या 'एसआयटी'च्या (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांची शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी आज भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधारे यांनी खरातचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे १० धक्कादायक फोटो सार्वजनिक करत खळबळ उडवून दिली आहे.
बड्या नेत्यांशी कनेक्शन?
सुषमा अंधारे यांनी दाखवलेल्या फोटोंमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेते अशोक खरातसोबत दिसत आहेत. खरातने आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून महिलांचे शोषण केले का? आणि त्याला कोणाचे अभय होते? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
एसआयटीकडून सखोल तपास सुरू
अशोक खरातवर एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीच्या पथकाने नुकतीच खरातच्या त्या केबिनचीही पाहणी केली, जिथे हे गैरप्रकार चालत असत. तपास पथकाला तिथे काही संशयास्पद वस्तू आणि पुरावे आढळल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
"केवळ फोटो असणे म्हणजे गुन्हा नाही, पण या संबंधांचा वापर पीडितांवर दबाव आणण्यासाठी किंवा गुन्हे लपवण्यासाठी झाला आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे," असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. या प्रकरणातील गांभीर्य पाहता त्या लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करणार आहेत.
सामाजिक वर्तुळात संताप
भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाचे हायप्रोफाईल कनेक्शन पाहून नाशिककरांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणात आणखी किती बडे मासे अडकणार आणि पोलीस खरातवर काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.