नाशिक, (प्रतिनिधी) २७ मार्च - शहरात सायबर गुन्हेगारांनी आता गॅस ग्राहकांना आपले लक्ष केले आहे. 'तुमची गॅस लाईन बंद होईल' अशी भीती दाखवून एका महिलेला बनावट 'एपीके' (APK) फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडत, सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ६२ हजार ७९३ रुपयांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीधर दत्तात्रेय धाराशिवकर (रा. मेनलो पार्क, पाईपलाईन रोड, आनंदवली) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. २०) रात्री धाराशिवकर दाम्पत्य घरी असताना अर्चना धाराशिवकर यांच्या मोबाईलवर 'एमएनजीएल' (MNGL) गॅस कंपनीच्या नावाने एक संदेश प्राप्त झाला. त्यात "तुमचे गॅस कनेक्शन कापले जाईल" अशी भीती दाखवण्यात आली होती.
फसवणुकीची पद्धत
धमकावणारा मेसेज: कनेक्शन चालू ठेवण्यासाठी ७०६१८७६४२० या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
बनावट लिंकचा वापर: धाराशिवकर यांनी संपर्क साधला असता, समोरून बोलणाऱ्या भामट्याने आपण गॅस कंपनीतून बोलत असल्याचे भासवले. त्याने प्रक्रियेसाठी एक 'एपीके' फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले.
माहितीची चोरी: केवळ १० रुपये भरण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली. या फाईलच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा मिळवत भामट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डसह एचडीएफसी आणि कोटक बँक खात्यातून एकूण १ लाख ६२ हजार ७९३ रुपये परस्पर लांबवले.
पोलीस तपास सुरू
या मोठ्या आर्थिक फसवणुकीनंतर धाराशिवकर यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणतीही संशयास्पद 'फाईल' डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोणत्याही अधिकृत कंपन्या (MNGL, महावितरण इ.) ग्राहकांना 'APK' फाईल डाऊनलोड करण्यास सांगत नाहीत. अशा प्रकारचा मेसेज आल्यास तात्काळ अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.