येवला, (प्रतिनिधी) २७ मार्च - येवल्यातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणाऱ्या आणि युवा पिढीला प्रोत्साहन देणाऱ्या भुजबळ ब्रिगेड आयोजित ‘येवला प्रीमियर लीग’या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे रविवार,दि.२९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता गौशाळा मैदान, येवला येथे महाराष्ट्राचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन होणार आहे. या उद्दघाटन सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ उपस्थित राहणार आहे.तसेच ‘सारेगमप’ फेम गायिका श्वेता दांडेकर यांच्या सुरेल गायनाने उद्घाटन सोहळा ठरणार खास ठरणार आहे. या सोहळ्यास क्रीडा प्रेमी व येवलेकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक भुजबळ ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भुजबळ ब्रिगेड आयोजित ‘येवला प्रीमियर लीग’ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दि.२९ मार्च ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार असून,येवल्यात क्रिकेटचा अक्षरशः महासंग्राम रंगणार आहे. क्रीडा, उत्साह, स्पर्धात्मकता आणि मनोरंजन यांचा संगम असलेल्या या स्पर्धेकडे संपूर्ण येवला शहर आणि परिसराचे लक्ष लागले आहे. येवल्यातील ग्रामीण व शहरी भागातील क्रिकेटप्रेमी युवकांना दर्जेदार व्यासपीठ मिळावे, स्थानिक प्रतिभेला संधी मिळावी आणि येवल्यातील क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध व्हावी, या उद्देशाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून ‘येवला प्रीमियर लीग’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून,युवकांना संघभावना, शिस्त, स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास देणारा एक मोठा सामाजिक आणि क्रीडा उपक्रम आहे.
‘येवला प्रीमियर लीग’साठी गौशाळा मैदानावर भव्य स्वरूपात तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आयोजकांनी प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी आधुनिक व आकर्षक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
अशी असेल विशेष व्यवस्था
- ३ हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था
- एकावेळी ६ हजारांहून अधिक नागरिक सामना पाहू शकतील अशी क्षमता
- मैदानावर १० पार लाईटची व्यवस्था
- डे-नाईट सामने पाहण्यासाठी अत्याधुनिक प्रकाशयोजना
- खेळाडू, पंच, आयोजक आणि प्रेक्षकांसाठी सुयोग्य नियोजन
महाराष्ट्रात प्रथमच ‘पाटा विकेट – बोथ एंड डे-नाईट’सामन्यांचा प्रयोग
येवला प्रीमियर लीग या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘पाटा विकेट बोथ एंड डे-नाईट’ सामन्यांचा महाराष्ट्रात प्रथमच येवल्यात प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आकर्षण केवळ येवला तालुक्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्हा आणि राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठीही हे एक वेगळे आकर्षण ठरणार आहे. नवीन तांत्रिक पद्धती, प्रकाशझोतातील सामने आणि स्पर्धेचे व्यावसायिक स्वरूप यामुळे ‘येवला प्रीमियर लीग’ ही केवळ स्पर्धा नसून एक संस्मरणीय क्रीडा महोत्सव ठरणार आहे.
उद्घाटनाच्या दिवशीच रंगणार प्रेक्षणीय सामना
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रेक्षकांना एक दमदार क्रिकेट लढत अनुभवता येणार आहे.
यामध्ये लिजेंट किशोर माळी विरुद्ध मास्टर राजू पवार या दोन संघांमधील सामना क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरणार असून, उद्घाटन सोहळ्यालाच मैदानावर थरार,जल्लोष आणि क्रीडारसिकांचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.
आकर्षक बक्षिसांची रेलचेल
‘येवला प्रीमियर लीग’मध्ये सहभागी होणाऱ्या संघांसाठी आणि खेळाडूंसाठी आयोजकांनी अत्यंत आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे.
स्पर्धेतील बक्षिसे :
-प्रथम बक्षीस : ₹ १,११,०००/-
-द्वितीय बक्षीस : ₹ ७७,७७७/-
-तृतीय बक्षीस : ₹ ५५,५५५/-
-चतुर्थ बक्षीस : ₹ ३३,३३३/-
याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध वैयक्तिक बक्षिसेदेण्यात येणार आहेत.
‘मॅन ऑफ द सिरीज’ला बाईकचे आकर्षक बक्षीस
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस म्हणजेच ‘मॅन ऑफ द सिरीज’विजेत्यास बाईक हे विशेष आणि आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर अशा विविध गटांतही वैयक्तिक सन्मान देण्यात येणार असल्याने खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
महिलांसाठी दररोज प्रश्नमंजुषा,विजेत्यांना पैठणी भेट
‘येवला प्रीमियर लीग’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी दररोज विशेष प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्याचा आयोजकांचा प्रयत्न असून,विजेत्या महिलांना पैठणी भेट देण्यात येणार आहे. यामुळे ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता,संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंदोत्सव ठरणार आहे.
क्रिकेटचा थरार आणि सुरांचा नजराणा,येवलेकरांसाठी दुहेरी आनंद
‘येवला प्रीमियर लीग’च्या उद्घाटन सोहळ्याला यंदा क्रीडा आणि कलेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.कारण या भव्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला‘सारेगमप’ फेम प्रसिद्ध गायिका श्वेता दांडेकर आपल्या सुरेल गायनाने चार चाँद लावणार आहेत. एकीकडे मैदानावर क्रिकेटचा थरार, जल्लोष, चौकार-षटकारांचा पाऊस आणि दुसरीकडे श्वेता दांडेकर यांच्या मधुर आवाजातील सुरांची जादू अशा दुहेरी आनंदाचा अविस्मरणीय अनुभव येवलेकरांना या सोहळ्यात घेता येणार आहे. यामुळे २९ मार्चचा उद्घाटन सोहळा हा केवळ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नसून, येवल्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा उर्जेचा भव्य उत्सव ठरणार आहे.
येवला प्रीमियर लीग मध्ये एकूण १६ संघांचा समावेश
येवला मतदारसंघातील सर्व आठ गट व येवला शहर यातून एकूण १६ संघांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
१.येवला टायगर्स
२.येवला फायटर्स
३.येवला मास्टर्स
४.येवला ब्लास्टर्स
५.मावळा चेंडूफळी
६.एव्हरग्रीन ११
७.सह्याद्री वॉरियर पाटोदा
८.लासलगाव चॅलेंजर्स
९.अंदरसूल स्ट्रायकर्स
१०.राजापूर अवेंजर्स
११.मुखेड ग्लॅडिएटर
१२.सनरायजर्स नगरसूल
१३.विचूर रेंजर्स
१४.देवगाव रॉकर्स
१५.गुडमॉर्निंग ४०+
१६.डॉक्टर्स ३६५
सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण
‘येवला प्रीमियर लीग २०२६’मधील सर्व सामने ७० टी - ७० टी मुंबई यांच्या वतीने विशेष चार कॅमेऱ्यांच्या साहाय्याने अत्यंत दर्जेदार पद्धतीने युट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. यामुळे येवल्यात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या क्रीडाप्रेमींनाही घरबसल्या स्पर्धेतील प्रत्येक क्षण अनुभवता येणार आहे. येवल्यासह महाराष्ट्र, देश आणि जगभरातील नागरिकांना या भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार लाईव्ह पाहण्याची संधी मिळणार असून, स्पर्धेची व्याप्ती अधिक व्यापक होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार, मैदानावरील जल्लोष आणि प्रत्येक सामन्याची रोमांचकता थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा हा विशेष उपक्रम ठरणार आहे.
‘येवला प्रीमियर लीग’ या क्रिकेट स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी, संगीतप्रेमी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि येवलेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भुजबळ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सहभागी १६ संघांच्या जर्सीचे अनावरण
भुजबळ ब्रिगेड आयोजित "येवला प्रीमियर लीग २०२६" या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील सहभागी १६ संघांच्या जर्सीचे आज येवला संपर्क कार्यालयात अनावरण करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी सर्व संघाच्या कर्णधारांसोबत व खेळाडूंसोबत संवाद साधून या स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भुजबळ ब्रिगेड स्पर्धेचे समन्वयक नितीन गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, सुनील पैठणकर,दीपक गायकवाड, समन्वयक राजेंद्र पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.