नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २७ मार्च - धार्मिक विधी आणि तांत्रिक पूजेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या कुप्रसिद्ध भोंदू बाबा अशोक खरात याच्याभोवती पोलिसांनी फास अधिक घट्ट केला आहे. विशेष तपास पथकाने (SIT) गुरुवारी खरातच्या कार्यालयावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि तांत्रिक पूजेचे साहित्य जप्त केले आहे. खरातची सर्व बँक खाती तातडीने 'सीझ' करण्यात आली असून, त्याचे आर्थिक मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
कार्यालयावर एसआयटीचा छापा; 'क्राईम सीन' जाहीर
गुरुवारी एसआयटीसह फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने खरातच्या कार्यालयाची कसून झडती घेतली. पोलिसांनी 'क्राईम सीन, डू नॉट क्रॉस'ची पिवळी पट्टी लावून संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. या कारवाईत कार्यालयातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, महिलांचे केस, तांब्याची बाटली, विविध धार्मिक पुस्तके आणि तांत्रिक पूजेसाठी वापरले जाणारे संशयास्पद पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या सर्व वस्तूंचा रीतसर पंचनामा करून पोलिसांनी कार्यालय सीलबंद केले आहे.
बँक खाती गोठवली; आर्थिक नाड्या आवळल्या
खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याला मिळणारी रसद तोडण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. खरातची सर्व बँक खाती शोधून ती तातडीने गोठवण्यासाठी बँकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याच्या घरातूनही काही डिजिटल पुरावे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.
गुंगीचे औषध आणि 'जडीबुटी' कनेक्शन
पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खरात त्यांना पेढा किंवा पाणी दिल्यानंतर गुंगी येत असल्याचे सांगितले होते. या गुंगीच्या औषधाचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी आता आपला मोर्चा आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांकडे वळवला आहे. खरात ज्या ठिकाणांहून जडीबुटी खरेदी करत होता, त्या व्यावसायिकांची सखोल चौकशी केली जाणार आहे. हे औषध घेतल्यावर शरीरावर काय परिणाम होतात, याची खातरजमा पोलीस तज्ज्ञांकडून करून घेणार आहेत.
खोट्या रत्नांचा काळा बाजार; सराफही रडारवर
तपासात असे समोर आले आहे की, खरात अत्यंत स्वस्त दर्जाचे किंवा काचेचे खडे भाविकांना 'चमत्कारी' असल्याचे सांगून लाखो रुपयांना विकत असे. या व्यवसायात त्याचे काही सराफ व्यावसायिकांशीही लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता संबंधित सराफांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
पोलीस कोठडीत वाढ?
खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, रविवारी त्याला पुन्हा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपासातील नवीन धागेदोरे पाहता पोलीस त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.