भोंदू खरात प्रकरण.. पीडितेची ओळख उघड करणाऱ्यांना पोलिसांचा दणका... तिघांवर गुन्हे दाखल...

Share:
Main Image
Last updated: 27-Mar-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २७ मार्च - भोंदूबाबा अशोक खरात याच्या अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास करत असतानाच, आता पीडित महिलांची ओळख आणि आक्षेपार्ह चित्रफिती (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्यांविरोधात विशेष तपास पथकाने (SIT) आपली मोहीम तीव्र केली आहे. पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही पीडितेची ओळख उघड करणाऱ्या तिघांविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पीडित तरुणी आणि कुटुंब मानसिक तणावात
सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या पहिल्या पीडित महिलेची ओळख समाजमाध्यमांवर उघड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पीडित तरुणी नैराश्यात गेली असून तिचे संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आणि विशेष पथकाने कडक इशारा दिला आहे की, पीडित महिला किंवा त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटेल अशी कोणतीही कृती केल्यास संबंधितांना तुरुंगाची हवा खावी लागेल.

Advertisement

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनवरही होणार कारवाई
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील कोपरगाव परिसरातील 'BMW' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करून राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना ताब्यात घेतले आहे. तपासात ही चित्रफित बीड येथील संदीप गर्जे याने पाठविल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यामुळे केवळ व्हिडिओ शेअर करणारेच नव्हे, तर ग्रुप ॲडमिनवरही कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे.

सायबर विभागाची 'करडी नजर'
सायबर विभाग सध्या सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की:
पीडितेच्या घराची, कुटुंबाची किंवा नातेवाईकांची ओळख उघड होईल असे व्हिडिओ प्रसारित करू नका.
अश्लील व्हिडिओ, ए.आय. जनरेटेड (AI Generated) किंवा मॉर्फ केलेले फोटो तात्काळ डिलीट करा.
असे साहित्य बाळगणे किंवा फॉरवर्ड करणे हा गंभीर गुन्हा आहे.

"पीडित महिलांचे मानसिक खच्चीकरण होईल असे कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ज्यांच्याकडे अशा चित्रफिती असतील, त्यांनी त्या तात्काळ नष्ट कराव्यात," असे स्पष्ट निर्देश विशेष तपास पथकाने दिले आहेत.

Comments

No comments yet.