वडाळागावात भाईगिरी वसुली... बिटकोत रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण... गुंडांचे नाशिक पोलिसांना खुले आव्हान?

Share:
Main Image
Last updated: 27-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ मार्च - शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, वडाळागाव आणि नाशिकरोड परिसरात टोळक्यांनी दहशत माजविली आहे. वडाळागावात 'भाई' असल्याचे सांगत व्यावसायिकाकडून हप्ता वसुली करत लुटमार करण्यात आली, तर बिटको रुग्णालयाच्या आवारात किरकोळ वादातून एका कुटुंबावर हल्ला चढवण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘आम्ही इथले भाई... शंभर रुपये हप्ता द्यावा लागेल’
वडाळागावातील रेहमतनगर भागात बुधवारी (दि. २५) दुपारी ही घटना घडली. संशयित नवाज शेख ऊर्फ घाफा, मुस्तकीन शेख, जाईद शेख आणि त्यांच्या साथीदारांनी हातात चॉपर व कोयते घेऊन दुचाकीवरून परिसरात प्रवेश केला. "तुम्ही आमचे फोटो पोलिसांना पाठवता का?" असा जाब विचारत या टोळक्याने व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण केली. यावेळी दानिश अक्रम खान या व्यावसायिकाच्या मानेला कोयता लावून, "आम्ही या भागातील भाई असून प्रत्येकाला दरमहा १०० रुपये हप्ता द्यावा लागेल," अशी धमकी देण्यात आली. संशयितांनी खान यांच्या खिशातील ९०० रुपये बळजबरीने काढून घेत तेथून पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर तपास करत आहेत.

Advertisement

बिटको रुग्णालयात जेवण करणाऱ्या कुटुंबावर हल्ला
दुसरी घटना नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या आवारात घडली. शिवाजी मुरलीधर धोंगडे यांची आई आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी (दि. २२) रात्री साडेअकराच्या सुमारास धोंगडे हे त्यांच्या बहिणी, भाऊ आणि भावजयीसह वॉर्डाच्या बाहेर जेवण करत असताना संशयित सचिन कसबे, किशोर कसबे, ईश्वर कसबे, रोहन कसबे, दानिल अंबोरे व सीमा कसबे यांनी जुन्या वादाची कुरापत काढून त्यांच्यावर हल्ला केला.
संशयितांनी कड्याने आणि चावीने मारहाण केल्याने तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार गायकवाड पुढील तपास करत आहेत.

वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिक पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Comments

No comments yet.