सातपूरला मायलेकींचा पाठलाग करून अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी... अंबडला घरात घुसून तरुणीला लग्नासाठी धमकावले...

Share:
Last updated: 26-Mar-2026

नाशिक  ( प्रतिनिधी ) २६ मार्च -  शहरातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सातपूरमध्ये मायलेकींचा पाठलाग करून त्यांना अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली, तर अंबडमध्ये एका तरुणाने घरात घुसून तरुणीचा विनयभंग केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातपूर: पाठलाग करून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय युवराज पाटील (रा. बदलापूर, ठाणे) आणि मनोज लोणे नावाचा युवक गेल्या काही दिवसांपासून मायलेकींचा पाठलाग करत होते. रविवारी (दि. ८) सायंकाळी पीडित महिला जात असताना संशयितांनी दुचाकीवरून येत त्यांची वाट अडवली आणि विनयभंग केला. इतक्यावरच न थांबता, बुधवारी (दि. २५) पीडितेच्या मुलीच्या मोबाईलवर संपर्क साधून "मुलास जीवे मारू आणि मुलीवर अ‍ॅसिड टाकू" अशी भयानक धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलीस

Advertisement
ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार डिगे तपास करत आहेत.
अंबड: 'माझ्यासोबत पळून चल', घरात घुसून तरुणीला त्रास
दुसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. येथील संशयित विशाल सिंग (वय २०, रा. ऋषिता अपार्टमेन्ट) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २४) दुपारी पीडित तरुणी आणि तिची बहीण घरात असताना विशालने घरात प्रवेश केला. "तू माझ्यासोबत पळून चल, आपण लग्न करू" असा आग्रह धरत त्याने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने नकार देताच त्याने दोन्ही बहिणींना शिवीगाळ व दमदाटी केली. बहिणींनी आरडाओरड केल्यामुळे संशयिताने तेथून पळ काढला. पालकांनी घरी परतल्यावर मुलींनी हा प्रकार सांगितला आणि प्रकरण पोलिसात पोहोचले. हवालदार चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
औद्योगिक भागात भीतीचे वातावरण
औद्योगिक वसाहतींमध्ये कामगार महिला आणि तरुणींची मोठी वर्दळ असते. मात्र, दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Comments

No comments yet.