या बस खरेदीची होणार चौकशी... सरकारची विधिमंडळात घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 27-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ मार्च - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस खरेदी व निविदा प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि  यासाठी तातडीने घेण्यात आलेल्या बैठकीबाबत  विधिमंडळ सदस्यांनी केलेल्या शंकांसंदर्भात चौकशी केली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सुनील शिंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अमित गोरखे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

Advertisement

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, बस खरेदी व निविदा प्रक्रिया बैठकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे आयुक्त, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सीआयआरटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. बस खरेदी व निविदा प्रक्रिया ही ठराव आणि मंजुरीची प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली आहे. केवळ यासाठीची बैठक तातडीने घेण्यात आली आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या शंकेच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल.

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, राज्यात पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला  आहे.  ते म्हणाले, पुण्यात २५ टक्के अपेक्षित असलेल्या इलेक्ट्रिक बसच्या तुलनेत २७ टक्के बस  कार्यरत आहेत. मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसह सर्व प्रमुख शहरांत इलेक्ट्रिक बसांचे प्रमाण वाढवून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व पर्यावरणपूरक करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले

Comments

No comments yet.