वासनांध अशोक खरातचा आणखी एक गुन्हा उघड... शिर्डीच्या विद्यार्थिनीवर अनेक महिने बलात्कार...

Share:
Main Image
Last updated: 26-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ मार्च - स्वतःला देवाचा अवतार भासवून आणि करिअर घडवून देण्याचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, खरात विरोधातील हा आतापर्यंतचा सातवा गुन्हा आहे.

नेमकी घटना काय?
शिर्डी येथे शिक्षण घेणाऱ्या पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२४ मध्ये घराच्या बांधकामाबाबत सल्ला घेण्यासाठी ती आपल्या कुटुंबीयांसमवेत खरातच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात गेली होती. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये हे कुटुंब नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या 'ओक्स डेव्हलपर्स' या कार्यालयात आले होते.

Advertisement

असा केला अत्याचार...
पीडितेने तिच्या उज्ज्वल भविष्याबद्दल खरातकडे विचारणा केली असता, त्याने 'खासगीत बोलायचे आहे' असे सांगून तिच्या पालकांना केबिनबाहेर काढले. त्यानंतर
भूल देऊन कृत्य: पीडितेला तांब्यातील पाणी पिण्यास दिले, ज्यामुळे तिला ग्लानी आली आणि डोके जड पडले. याच स्थितीत खरातने तिच्यावर बलात्कार केला.
जीवे मारण्याची धमकी: पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, "मी महादेवाचा अवतार आहे, जर कोणाला सांगितले तर तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश होईल, वडिलांचा मृत्यू होईल," अशी भीती त्याने घातली.
वारंवार शोषण: या भीतीपोटी पीडिता गप्प राहिली, ज्याचा फायदा घेत खरातने जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात तिच्यावर चार वेळा अत्याचार केला.

एसआयटीकडून कसून चौकशी
अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून, त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये विशेष तपास पथकामार्फत (SIT) त्याची कसून चौकशी सुरू आहे. या भोंदू बाबाने अशाच प्रकारे आणखी किती महिलांची फसवणूक किंवा शोषण केले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अंधश्रद्धेपोटी किंवा भीतीपोटी कोणाचेही शोषण सहन करू नका. अशा भोंदू व्यक्तींविरुद्ध न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.