नाशिक, (प्रतिनिधी) २६ मार्च - बांधकाम व्यवसायासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने बांधकाम व्यावसायिकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रोसेसिंग फी आणि कागदपत्रांच्या नावाखाली ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित ठकबाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमराज जीवनलाल भावसार असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप ओधवजी ठक्कर (रा. गजानन मार्ग, इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
बनावट पत्राद्वारे विश्वास संपादन
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठक्कर यांचा बांधकाम व्यवसाय असून गेल्या वर्षी रविवार कारंजा परिसरात त्यांच्या एका नवीन प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पासाठी ठक्कर यांना मोठ्या कर्जाची गरज होती. याचाच फायदा घेत संशयित भावसार याने त्यांना 'एमबीएस' (MBS) कंपनीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याची खात्री दिली. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने ठक्कर यांच्याकडून इमारतीचे खरेदीखत, अप्रूवल प्लॅन, कमेंसमेंट लेटर आणि सिटी सर्व्हे उतारा यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली.
अशी झाली फसवणूक
कर्ज मंजूर झाल्याचे भासवण्यासाठी संशयिताने ५ कोटींचे बनावट कर्ज मंजुरी पत्र (Sanction Letter) ठक्कर यांना दिले. या पत्रावर विश्वास ठेवून ठक्कर यांनी २४ जून ते ४ जुलै दरम्यान प्रोसेसिंग फी आणि अन्य कामांच्या नावाखाली संशयिताला धनादेश व आरटीजीएसद्वारे एकूण १४ लाख रुपये दिले.
नऊ महिने उलटले तरी कर्ज मिळेना
पैसे देऊन नऊ महिने उलटले तरी कर्ज मिळाले नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळेनाशी झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठक्कर यांनी पोलिसांत धाव घेतली. संशयिताने या रकमेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. गंगापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.