मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तो व्हिडीओ व्हायरल... राजकीय वर्तुळात खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 26-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ मार्च - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांची एक कथित अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेसने झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?
व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत एका बिछान्यावर बसलेले दिसत आहेत. ही व्यक्ती पवन यादव असून, त्याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही चित्रफीत मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील असून ती सुमारे सात महिन्यांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रफितीमध्ये दोघांच्या शेजारी मद्य आणि खाद्यपदार्थही दिसत आहेत.

राजकीय षडयंत्राची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी अस्वस्थता आहे. मंत्रीपदासाठी पक्षात अनेक जण इच्छुक असून, त्या स्पर्धेतूनच झिरवाळ यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. झिरवाळ यांनी अलीकडेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर ही चित्रफीत बाहेर येण्यामागे अंतर्गत गटबाजीचे कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

विरोधकांचा हल्लाबोल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "मंत्री झिरवाळ यांची ही चित्रफीत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या नैतिक अध:पतनाचे उदाहरण आहे. अशा व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा," अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

झिरवाळ यांची मुख्यमंत्र्यांशी भेट
या प्रकरणाची कुणकुण लागताच मंगळवारी नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, झिरवाळ यांच्या स्वीय सहाय्यकांनी या प्रकरणी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनाही अशाच वादांमुळे मंत्रीपदे सोडावी लागली होती. आता झिरवाळ यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.