नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २६ मार्च - भारतातील आघाडीची मद्य उत्पादक कंपनी 'सुला वाईनयार्ड्स'ने (Sula Vineyards) जागतिक कीर्तीच्या 'मोएट हेनेसी इंडिया'सोबत मोठा व्यावसायिक करार केला आहे. या करारानुसार, सुला वाईनयार्ड्स नाशिकमधील दिंडोरी येथील 'शँडॉन'चा (Chandon) १९ एकरचा भव्य वाईन इस्टेट प्रकल्प विकत घेणार आहे. या विस्तारामुळे नाशिकच्या वाईन पर्यटनाला (Wine Tourism) मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे या करारात?
हा व्यवहार सुला वाईनयार्ड्सची उपकंपनी 'आर्टिसन स्पिरिट्स प्रायव्हेट लिमिटेड'मार्फत केला जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या करारामध्ये जमिनीसह वाईन निर्मिती प्रकल्प, इमारती आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. मात्र, 'शँडॉन' हा ब्रँड यामध्ये समाविष्ट नाही. या व्यवहारानंतर शँडॉन भारतातील वाईन उत्पादन थांबवणार असून, या इस्टेटमध्ये तयार होणारी वाईन सुला आपल्या स्वतःच्या पोर्टफोलिओ अंतर्गत विक्री करेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
क्षेत्रफळ: १९ एकरचा विस्तीर्ण परिसर.
उत्पादन क्षमता: सध्या वार्षिक ४.५ लाख लिटर उत्पादन क्षमता असून ती १३ लाख लिटरपर्यंत वाढवता येणे शक्य आहे.
पर्यटन: येथे एक प्रीमियम व्हिजीटर सेंटर, बँक्वेट हॉल आणि ५ एकरचे स्वतःचे द्राक्ष मळे आहेत.
मोक्याचे ठिकाण: नाशिक विमानतळापासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर असल्याने पर्यटकांची पसंती मिळेल.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्व
येणाऱ्या काळात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. याचा थेट फायदा या नवीन वाईन रिसॉर्टला होईल. सुलाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत यांनी याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, "शँडॉनने एक उत्कृष्ट पाया रचला आहे आणि आम्हाला या इस्टेटचे पूर्ण मूल्य अनलॉक करण्याची संधी मिळत आहे. गंगापूर धरणाजवळील आमच्या यशस्वी प्रकल्पाप्रमाणेच, दिंडोरी येथील हा प्रकल्प देखील वाईन पर्यटनाचा नवा लँडमार्क ठरेल."
शेअर बाजारात सकारात्मक प्रतिसाद
या बातमीनंतर शेअर बाजारातही 'सुला वाईनयार्ड्स'च्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी कंपनीचा शेअर १.७३ टक्क्यांनी वधारून १५२.५० रुपयांवर बंद झाला.