येवला, (प्रतिनिधी) २६ मार्च - पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या पुढाकारातून भव्य ‘ईद मिलन समारंभ’ तसेच सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांच्या कव्वाली महफिलचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता येवला येथील पोलीस परेड ग्राउंड,अँग्लो उर्दू हायस्कूल जवळ हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास येवलेकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांच्या सुमधुर आवाजात रंगणार्या कव्वाली महफिलीचा विशेष आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. पारंपरिक सूफी संगीताच्या माध्यमातून अध्यात्म, प्रेम आणि एकतेचा संदेश देणारी ही कव्वाली महफिल कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या ‘ईद मिलन समारंभा’च्या माध्यमातून सर्व समाजघटकांना एकत्र आणून सामाजिक ऐक्य दृढ करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येणाऱ्या ईदच्या सणाचा आनंद सर्वांनी एकत्र साजरा करावा, तसेच परस्परांमध्ये प्रेम, सद्भावना आणि बंधुत्व वाढावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्यास कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यास येवलेकरांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा देत कव्वाली महफिलीचा आनंद घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.