चाकण परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार... या महामार्गाच्या कामाला मंजुरी...

Share:
Main Image
Last updated: 25-Mar-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) २५ मार्च - पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि चाकण परिसरातील भीषण वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणा कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

असा असेल नवीन महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वर होणारे हे काम दोन टप्प्यांत विभागले गेले असून, ते 'डीएफबीओटी' (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्सफर) पद्धतीने पूर्ण केले जाणार आहे:
१. पहिला टप्पा (० ते २६ किमी): तळेगाव ते चाकण दरम्यान ४ पदरी उन्नत (Elevated) मार्ग आणि त्याला समांतर ४ पदरी जमिनीवरील महामार्ग बांधला जाईल.
२. दुसरा टप्पा (२६ ते ४३ किमी): चाकण ते शिक्रापूर दरम्यान ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाचे काम केले जाईल.

Advertisement

'चाकण एमआयडीसी'ला मोठा लाभ
चाकण ही देशातील महत्त्वाची औद्योगिक वसाहत आहे, मात्र येथील वाहतूक कोंडीमुळे उद्योजक आणि कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. "हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाकणमधील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे ही कामे अत्यंत दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेतच पूर्ण करावीत," असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

राज्यात महामार्गांचे जाळे विणणार
राज्यातील दळणवळण अधिक सुलभ करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी महामार्गांचे जाळे विकसित करण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पुण्यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प युद्धपातळीवर राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे एमडी ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet.