नाशिक, (प्रतिनिधी) २५ मार्च - मोबाईल गेमिंगचे व्यसन तरुणाईसाठी किती घातक ठरू शकते, याचा प्रत्यय नाशिकमध्ये पुन्हा एकदा आला आहे. 'पबजी' (PUBG) गेम खेळण्यावरून पालकांनी हटकल्याने संतप्त झालेल्या एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात घर सोडल्याची धक्कादायक घटना होलाराम कॉलनी परिसरात घडली आहे. दोन दिवस उलटूनही मुलगा घरी न परतल्याने अखेर पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
साधू वासवाणी रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा अल्पवयीन मुलगा गेल्या काही दिवसांपासून 'पबजी' या ऑनलाइन गेमच्या आहारी गेला होता. दिवस-रात्र मोबाईलमध्ये मग्न राहणाऱ्या या मुलाला सोमवारी (दि. २३) रात्री त्याच्या वडिलांनी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला व गेम खेळण्यावरून कडक शब्दांत रागवले. वडिलांच्या ओरडण्याचा मुलाला इतका राग आला की, त्याने घरात कुणालाही काहीही न सांगता पलायन केले.
दोन दिवसांपासून शोध सुरू
मुलगा घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रांकडे त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, दोन दिवस उलटूनही त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर हताश झालेल्या मातेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगा असल्याने कायद्यानुसार, त्याला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन गेम्सचे आकर्षण वाढत असून, त्यातून होणारे वाद चिंतेचा विषय ठरत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार माळोदे करत आहेत. आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.