नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २५ मार्च - भोंदू ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याचे एकामागून एक काळे कारनामे उघड होत आहेत. मात्र, या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) गेल्या २० वर्षांपासून त्याच्या मागावर होती. या काळात खरात आणि त्याच्या समर्थकांनी 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवण्यापासून ते 'नामोनिशान मिटवून टाकण्या'पर्यंत अनेक धमक्या दिल्याचा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे.
२००७ मध्ये रिव्हॉल्वरचा धाक
२००७ मध्ये एका पत्रकाराच्या तक्रारीनंतर अंनिसचे कार्यकर्ते महेंद्र दातरांगे आणि प्रा. डॉ. सुदेश घोडेराव हे खरातच्या कार्यालयात गेले होते. खरातचे कृत्य अंधश्रद्धायुक्त आणि चुकीचे असल्याची जाणीव करून देताच, "मी निवृत्त कॅप्टन आहे, माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे," अशी धमकी त्याने कार्यकर्त्यांना दिली होती. त्यानंतर त्याने तीन महिने आपले दुकान बंद ठेवले होते, मात्र पुन्हा छुप्या पद्धतीने कारनामे सुरू केले.
'नामोनिशान मिटवू' : समर्थकांकडूनही दबाव
२०१३ मध्ये सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिराच्या एका ट्रस्टीने 'अंनिस'चे कार्यकर्ते अरुण घोडेराव यांच्याशी वाद घातला होता. "आमच्या खरात बाबांच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचे नामोनिशान नष्ट करू," अशी थेट धमकी यावेळी देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिरात भेट दिल्यानंतर अंनिसने जो प्रखर विरोध केला, तो शमवण्यासाठी राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्नही झाला होता.
पीडितांच्या भीतीचा घेतला फायदा
खरात विरोधात अनेक पीडित अंनिसकडे संपर्क साधत होते, मात्र त्याच्या दहशतीमुळे कुणीही पोलिसात तक्रार देण्यास धजावत नव्हते. अखेर त्याच्या पापाचा घडा भरला असून आता एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल होत आहेत. अंनिसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश येत असल्याचे चित्र आहे.
"आम्हाला सातत्याने धमक्या येत असतात, पण आम्ही विवेकवादी कार्यकर्ते आहोत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची आम्हाला शिकवण आहे. ते शहीद झाल्यापासून आम्ही मरण्याच्या भीतीवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही."
— कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस.