नाशिक, (प्रतिनिधी) २५ मार्च - नाशिक शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या चोवीस तासांत बलात्कारासह विनयभंगाच्या चार वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, पोटच्या मुलीचा विनयभंग आणि घरमालकिणीचा छळ अशा घटनांमुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी आडगाव, इंदिरानगर, अंबड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
आगरटाकळी परिसरातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शिवम नरेंद्र आढाव (रा. दसकगाव) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून संशयिताने तिच्या मुलीची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिला गर्भवती राहिल्यानंतर संशयिताने लग्नास नकार देत तिला गर्भपाताचा सल्ला दिला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक योगीता पाटील तपास करत आहेत.
२. नराधम बापाकडून मुलीचा विनयभंग
वडाळागाव परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या जन्मदात्या पित्यानेच विनयभंग केला. सलमान असलम पठाण असे या नराधम बापाचे नाव आहे. मुलगी घरात एकटी असताना त्याने हे कृत्य केले. पीडितेने प्रतिकार केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. आई घरी आल्यानंतर मुलीने आपबिती सांगितली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३. थकीत पगारावरून महिलेचा विनयभंग
सिडकोतील कामटवाडा परिसरात पगाराच्या वादातून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. दर्शन गायकवाड (२८) या संशयिताने महिलेच्या घरात घुसून तिला अश्लील शिवीगाळ केली. 'तुला उचलून नेईन आणि हात-पाय तोडून टाकीन' अशी धमकी देत त्याने विनयभंग केला. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हवालदार सोमनाथ गुंड पुढील तपास करत आहेत.
४. भाडे मागितल्याने अश्लील वर्तन
देवळाली कॅम्प परिसरात घरभाडे मागितल्याच्या कारणावरून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. पीडितेने भाडे करार संपल्याने भाड्याची मागणी केली असता, संशयित विक्रांत सोनकांबळे आणि प्रिया सोनकांबळे यांनी तिला अश्लील शिवीगाळ केली. विक्रांत सोनकांबळे याने विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हवालदार चव्हाण तपास करत आहेत.
या सर्व घटनांमधील संशयितांविरुद्ध पोलिसांनी कडक कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे....