नाशिक, (प्रतिनिधी) २५ मार्च - राज्यात भोंदू बाबांकडून होणाऱ्या भोंदूगिरीचे आणि अंधश्रद्धेचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. भक्तांच्या अज्ञानाचा आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या या प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आता पुढाकार घेतला आहे. पीडितांच्या मदतीसाठी समितीने विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले असून, नागरिकांनी न घाबरता पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कायद्याचा धाक तरीही शोषण सुरूच
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा संमत होऊनही भोंदूगिरीचे प्रकार थांबलेले नाहीत. अनेकदा पीडितांना कायदेशीर आधार कसा मिळवायचा किंवा कोणाकडे दाद मागायची, याची माहिती नसते. यामुळे गुन्हेगार मोकाट फिरतात. हीच अडचण ओळखून ‘अंनिस’ने पीडितांना थेट मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
पीडितांची ओळख राहणार गुप्त
या मोहिमेबाबत माहिती देताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी स्पष्ट केले की, “पीडितांना तक्रार करण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार मोफत समुपदेशन पुरविले जाईल. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, जेणेकरून त्यांना कोणत्याही सामाजिक दबावाचा सामना करावा लागणार नाही.”
येथे साधा संपर्क:
जर कोणी अंधश्रद्धेमुळे पीडित असेल किंवा कोणाचे शोषण होत असेल, तर त्यांनी खालील क्रमांकांवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा:
कृष्णा चांदगुडे: ९८२२६३०३७८
महेंद्र दातरांगे: ९७६३२९२३५६
अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता समाजाने जागरूक राहून भोंदूगिरीला पायबंद घालावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.