भोंदूबाबा खरातचे कांड.. पोलिसांचे ‘मिशन जस्टिस’ सुरू... काय आहे ते?

Share:
Main Image
Last updated: 24-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ मार्च - स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेत आध्यात्मिक आणि गूढ प्रथांच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबाविरुद्ध नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. या प्रकरणातील व्याप्ती पाहता, जास्तीत जास्त पीडित महिलांनी न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले असून तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट १ आणि गुंडा विरोधी पथकाने या भोंदू आरोपीला आधीच जेरबंद केले आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत पाच फौजदारी गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरील गैरप्रकारांवर पोलिसांची नजर
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच काही व्यक्ती सोशल मीडिया, यूट्यूब आणि न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पीडितांची ओळख उघड करणे किंवा त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन महत्त्वाचे इशारे दिले आहेत:

Advertisement

इशारा १ : AI-निर्मित मजकुरावर कारवाई
आरोपीचे महिलांसोबतचे 'एआय' (AI) निर्मित फोटो किंवा व्हिडिओ तयार करणे, ते प्रसारित करणे किंवा शेअर करून बदनामी करणे हा भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. यासाठी सायबर पेट्रोलिंग तीव्र करण्यात आले आहे.

इशारा २ : पीडितांची ओळख उघड करण्यास मनाई
कोणत्याही पीडित महिलेची, तिच्या नातेवाइकांची किंवा राहत्या घराची ओळख पटेल अशी माहिती सार्वजनिक करणे हा 'बीएनएस'च्या कलम ७२(१) नुसार दखलपात्र गुन्हा आहे. असे करणाऱ्यास दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

येथे संपर्क साधा
तपास पथकाला सहकार्य करण्यासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
पोलीस आयुक्त व्हॉट्सॲप क्रमांक: ९९ २३३ २३३ ११
SIT पथक मोबाईल क्रमांक: ९५०३२७०२२४, ७७७५८१९६३९

'तक्रारदाराचे नाव आणि माहिती कठोरपणे गोपनीय ठेवली जाईल, त्यामुळे पीडितांनी न घाबरता न्यायासाठी पुढे यावे,' असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.