भोंदूबाबा अशोक खरातचा विळखा वाढला... लैंगिक शोषणाचे एकापाठोपाठ ६ गुन्हे...

Share:
Main Image
Last updated: 24-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ मार्च - स्वत:ला 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या पाशात अडकलेल्या पीडितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खरातविरुद्ध आतापर्यंत लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे आणखी ३ गुन्हे दाखल झाले असून, एकूण गुन्ह्यांची संख्या ६ वर पोहोचली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी पीडित महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय राखण्याचे आश्वासन दिले आहे.

SIT मार्फत सखोल तपास सुरू
अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि नागरिकांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाच्या प्रमुख आणि आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सखोल तपास सुरू आहे. जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसे या भोंदू बाबाचे काळे कारनामे उघड होत आहेत.

गुन्ह्यांची संख्या ६ वर; पीडितांना पुढे येण्याचे आवाहन
सुरुवातीला काही मोजक्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, मात्र आता तक्रारदारांचा आकडा वाढला आहे. ताज्या माहितीनुसार, खरातविरुद्ध ६ फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांचे लैंगिक शोषण आणि मोठ्या प्रमाणावर केलेली फसवणूक यांचा समावेश आहे. अनेक पीडित महिला सामाजिक दबावापोटी किंवा भीतीपोटी पुढे येण्यास कचरत आहेत, हे ओळखून पोलिसांनी जाहीर आवाहन केले आहे.

Advertisement

"सदर आरोपीने कोणासोबतही अपराध केला असल्यास किंवा कोणाकडे या गुन्ह्यांशी संबंधित उपयुक्त माहिती असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची किंवा तक्रार करणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल," असे आवाहन SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

येथे साधा संपर्क (हेल्पलाईन क्रमांक)
पोलिसांनी या प्रकरणासाठी खालील अधिकारी आणि मोबाईल क्रमांकांची उपलब्धता करून दिली आहे:
१) किरणकुमार सूर्यवंशी (पोलीस उप अधीक्षक)
२) तृप्ती सोनवणे (महिला पोलीस निरीक्षक)
३) राहुल मोरे (पोलीस निरीक्षक)

SIT पथक मोबाईल क्रमांक:
९५०३२७०२२४
७७७५८१६३८९
नाशिक पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि जर कोणाची फसवणूक झाली असेल, तर निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा.

Comments

No comments yet.