नाशिकमध्ये एकाच दिवशी तीन तरुणांनी संपविली जीवनयात्रा..१६ वर्षीय मुलाचा समावेश...

Share:
Last updated: 23-Mar-2026

नाशिक, ( प्रतिनिधी ) २३ मार्च -  नाशिक शहर आणि परिसरात आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, रविवारी (दि. २२) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन तरुणांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. मृतांमध्ये एका १६ वर्षीय मुलाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या तिन्ही घटनांमध्ये आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
१. अंबडमध्ये २१ वर्षीय युवकाची आत्महत्या

पहिली घटना अंबड गावातील आशिर्वादनगर भागात घडली. येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहणारा चेतन कांतीलाल चौधरी (२१) याने रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. वडील कांतीलाल चौधरी यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषित केले. अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार सावळे पुढील तपास करीत आहेत.
२. सातपूर औद्योगिक वसाहतीत १९ वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय

Advertisement

दुसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. येथील धर्माजी कॉलनीतील रहिवासी अजय विष्णू भोये (१९) याने रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. त्याचा भाऊ ईश्वर भोये याने त्याला तात्काळ रुग्णालयात हलविले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार पाटील तपास करत आहेत.
३. १६ वर्षीय मुलाने किचनमध्ये संपविले जीवन

तिसरी धक्कादायक घटना पंचवटीतील तारवालानगर भागात उघडकीस आली. लोखंडे मळ्यातील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारा वीर भगवान तळेकर (१६) या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री राहत्या घरातील किचनमध्ये छताच्या लोखंडी कडीला स्कार्फ बांधून गळफास घेतला. वडील भगवान तळेकर यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पंचवटी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून हवालदार भोये तपास करीत आहेत.
वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, नैराश्यातून तरुण अशी टोकाची पावले उचलत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet.