भोंदूबाबा अशोक खरातचा वासनांध चेहरा उघड...  सात महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार...

Share:
Main Image
Last updated: 23-Mar-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २३ मार्च - नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला असून, त्याच्या अत्याचाराचे एकामागून एक भयानक पदर उलगडू लागले आहेत. मुलगा होण्यासाठी आणि सुरक्षित प्रसूतीसाठी विधी करण्याच्या बहाण्याने खरातने आपल्याच कर्मचाऱ्याच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध बलात्कारासह जादुटोणाविरोधी कायद्यान्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रद्धेचा गैरफायदा आणि क्रूर कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा पती हा खरातच्या 'ओकस प्रॉपर्टीज' या कार्यालयात नोकरीला होता. खरातकडे येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहून पीडितेच्या पतीने श्रद्धेपोटी २०२३ मध्ये आपल्या ३० वर्षीय गर्भवती पत्नीला खरातकडे नेले होते. यावेळी संशयित खरातने "तुला मुलगा होईल आणि बाळाचा जन्म सुरक्षित होईल" अशी ग्वाही दिली. यासाठी विशेष पूजा करावी लागेल असे सांगून त्याने पीडितेला आपल्या केबिनमध्ये बोलावले.

केबिनमध्ये अंधार करून अत्याचार
खरातने पीडितेच्या पतीला केबिनबाहेर थांबवून आतले दिवे बंद केले. मंत्रोच्चाराचा बहाणा करत त्याने सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पीडितेच्या पतीने खरातविरुद्ध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, याची कुणकुण लागताच नराधम खरातने पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये पीडितेच्या पतीला नोकरीवरून काढून टाकले.

Advertisement

'पेन ड्राइव्ह'मध्ये पापाचा पुरावा
भितीपोटी शांत असलेला हा तरुण खरातचे कारस्थान उघड होताच रविवारी (दि. २२ मार्च) पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने खरातच्या गैरकृत्यांचे सबळ पुरावे असणारा 'पेन ड्राइव्ह' पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या पुराव्यांमुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलीस कोठडीची मुदत वाढण्याची दाट शक्यता आहे.

गुन्ह्यांची मालिका आणि एसआयटीचा विळखा
अशोक खरात आणि त्याच्या टोळीविरुद्ध आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत:
डिसेंबर २०२५: खरातच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांत खंडणीचा गुन्हा (दोन संशयितांवर).
फेब्रुवारी २०२६: शिर्डी पोलिसांत खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवविरुद्ध गुन्हा.
१७ मार्च २०२६: नाशिकच्या एका पीडितेच्या तक्रारीवरून पहिला गुन्हा.
२२ मार्च २०२६: गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा.
सध्या या सर्व प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत असून, अजूनही काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या भोंदूगिरीला बळी पडू नका. कोणाकडूनही छळ होत असल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.