गुन्हेगार की बाबा? ५५ कोटींचा खर्च अन् भोंदूगिरीचे आरोप... 'बडे बाबा' अडचणीत

Share:
Main Image
Last updated: 23-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ मार्च - नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात भोंदूगिरीचे गुन्हे दाखल असलेला गणेश जयराम जगताप उर्फ 'बडे बाबा' याने आता निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे ५५ कोटींचे 'कामाख्या देवी' मंदिर उभारून काळ्या जादूचा नवा अड्डा सुरू केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केला आहे. विशेष म्हणजे, आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार येणार असल्याची खोटी जाहिरातबाजी करून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी या भोंदूवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी 'अंनिस'ने राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नेमके प्रकरण काय?
गणेश जगताप याच्यावर यापूर्वीच भोंदूगिरीचे गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याने धारणगाव खडक येथे ५५ कोटी रुपये खर्चून मंदिर बांधले असून, तिथे तो तथाकथित 'काळी जादू' करत असल्याचे 'अंनिस'चे म्हणणे आहे. १९ मार्च २०२६ पासून या ठिकाणी त्याने मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे.

व्हीआयपींच्या नावाचा गैरवापर
या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक खासदार आणि आमदारांची उपस्थिती राहणार असल्याचे भासवण्यात आले आहे. मात्र, ही निव्वळ 'फसवी जाहिरात' असून प्रशासकीय पदांवरील व्यक्तींच्या नावाचा वापर करून सर्वसामान्यांच्या श्रद्धेशी खेळ सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Advertisement

"या भोंदू बाबाने ५५ कोटींचे मंदिर बांधून तिथे काळी जादू सुरू केली आहे. आपल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीची खोटी जाहिरात देऊन तो लोकांची दिशाभूल करत आहे. शासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या भोंदूवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे."

— कृष्णा चांदगुडे, (राज्य कार्यवाह, अंनिस)

'अंनिस'च्या आक्रमक मागण्या:
५५ कोटींचा स्त्रोत तपासा: एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडे ५५ कोटी रुपये आले कुठून? याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी व्हावी.
जादूटोणाविरोधी कायदा: काळ्या जादूच्या नावाखाली होणाऱ्या प्रकारांवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये कठोर कारवाई करावी.
फसवणुकीचा गुन्हा: मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींच्या नावाचा खोटा वापर केल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल करावा.

या पत्रावर राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे आणि राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या असून, नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस यावर काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.