नाशिक: औद्योगिक वसाहतीत महिलांची सुरक्षा ऐरणीवर… दोन वेगवेगळ्या घटनांत विनयभंगाचे गुन्हे दाखल…

Share:
Last updated: 22-Mar-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), | दि. २२ मार्च २०२६

शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड आणि सातपूर परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ वादातून दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एका सराईत गुन्हेगाराचाही समावेश आहे.

मद्यधुंद गुन्हेगाराचा सावतानगरमध्ये धुमाकूळ

पहिली घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. येथील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार शंतनु आण्णासाहेब भोर (२७, रा. बाजीप्रभू चौक) याने शुक्रवारी (दि. २०) रात्री मद्याच्या नशेत पीडितेच्या घरासमोर अश्लील शिवीगाळ केली. पीडितेने या कृत्याचा जाब विचारला असता, संशयित भोर याने तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे, तर पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पीडितेने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. हवालदार बनतोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement

मेन्टेनन्सच्या वादातून सोसायटीत राडा

दुसरी घटना सातपूरमधील श्रमिकनगर येथील कडेपठाड चौकात घडली. शनिवारी (दि. २१) सकाळी सोसायटीच्या थकबाकी असलेल्या मेन्टेनन्सवरून मोठा वाद झाला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सुनील काशिनाथ पवार, त्याची पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेल्या ३ ते ४ जणांनी सोसायटी सदस्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ व मारहाण केली. या वादादरम्यान संशयितांपैकी एकाने पीडितेसह इतर महिलांचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सातपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हवालदार बनकर पुढील तपास करत आहेत.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी

औद्योगिक वसाहतीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत असल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा प्रवृत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

 

Comments

No comments yet.