नाशिकमध्ये चोऱ्यांचा सुळसुळाट... निवृत्त कर्नलसह 'बीएसएनएल'ला चोरट्यांचा दणका...

Share:
Last updated: 22-Mar-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), दि. २२ मार्च २०२६

नाशिक शहर आणि परिसरात घरफोडी व चोऱ्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या कारमधून महत्त्वाची कागदपत्रे लंपास करण्यासोबतच, 'बीएसएनएल'ची लाखो रुपयांची भूमिगत केबल चोरून नेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

निवृत्त कर्नलच्या कारमधून 'लेदर बॅग' लंपास

पहिली घटना अमृतधाम परिसरातील फायर ब्रिगेड केंद्राजवळ घडली. लष्कराच्या कर्नल पदावरून निवृत्त झालेले जयाजी दत्तात्रेय कोहोक (रा. टागोरनगर) यांचे या भागात सीएनजी स्टेशन आहे. गुरुवारी (दि. १९) सकाळी कोहोक आपल्या कारने (MH 15 GR 8109) स्टेशनवर गेले होते. सर्व्हिस रोडवर कार पार्क करून ते रजिस्टर तपासणीसाठी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी कारच्या पाठीमागील खिडकीची काच शिताफीने उघडून आतील लेदरची बॅग चोरून नेली. या बॅगेत 'एमएनजीएल'च्या फाईल्स, इंडियन आर्मीची महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हवालदार राजोळे तपास करत आहेत.

Advertisement

रस्त्यांच्या कामाचा फायदा घेत 'बीएसएनएल'ला ५ लाखांचा गंडा

दुसरी मोठी चोरी इंदिरानगर परिसरातील वडाळा-पाथर्डी मार्गावर घडली. सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात रस्ते रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत. रस्ते खोदल्यामुळे भूमिगत केबल्स उघड्या पडल्या आहेत, याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. रथचक्र सोसायटी चौक ते अपोलो फार्मा दरम्यानची सुमारे ७९३ मीटर लांबीची टेलिफोन वायर चोरट्यांनी शुक्रवारी (दि. २०) रात्री लंपास केली. या वायरची किंमत ५ लाख ७९ हजार ७३४ रुपये असून सिडको विभागाचे राहुल थोरात यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमादार साळी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शहरात भीतीचे वातावरण

एकीकडे निवृत्त लष्करी अधिकारी आणि दुसरीकडे सरकारी मालमत्ता चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्ते कामासाठी खोदलेल्या चर चोरांसाठी 'संधी' ठरत असल्याने महापालिका आणि टेलिफोन विभागानेही सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

Comments

No comments yet.