सराफ व्यावसायिकांनो, सावधान... ही टोळी अशा प्रकारे लावतेय चुना... 

Share:
Last updated: 22-Mar-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), | दि. २२ मार्च २०२६

सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडलेले असताना आता भामट्यांनी सराफ व्यावसायिकांना लुटण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधल्या आहेत. सिडको परिसरात 'युपीआय' (UPI) पेमेंट झाल्याचे भासवून दोन सराफी पेढ्यांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

'फेक' ट्रान्झॅक्शनचा असा झाला वापर

उपेंद्रनगर भागातील 'वेद अलंकार' या सराफी पेढीचे मालक अजय वसंत मोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्या दुकानात चांदीची साखळी खरेदी करण्यासाठी आले. त्यांनी २३.५०० ग्रॅम वजनाची आणि ५ हजार ८०० रुपये किमतीची साखळी पसंत केली. पैसे देण्याची वेळ आली तेव्हा भामट्यांनी 'फोन पे'द्वारे पैसे पाठवल्याचे मोबाईलवर भासवले. प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नसतानाही, व्यवहार यशस्वी झाल्याचे स्क्रीनवर दाखवून ते पसार झाले. मोरे यांनी नंतर तपासणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Advertisement

एकाच पद्धतीचा अवलंब करून दोन ठिकाणी चोरी

अशाच प्रकारची घटना बुधवारी (दि. १८) त्रिमूर्ती चौक परिसरातील 'कमल ज्वेलर्स'मध्येही घडली. येथील महिला व्यावसायिक जयश्री दंडगव्हाळ यांनाही या टोळीने अशाच पद्धतीने गंडवले. चांदीची साखळी खरेदी करून ऑनलाईन पैसे दिल्याचे नाटक करत भामट्यांनी त्यांनाही चुना लावला. या दोन्ही घटनांमध्ये सराफ व्यावसायिकांचे एकूण ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

व्यापाऱ्यांनो, सतर्क राहा!

ऑनलाईन पेमेंट स्वीकारताना केवळ समोरच्या व्यक्तीचा मोबाईल स्क्रीन न पाहता, स्वतःच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा 'मेसेज' किंवा 'ॲप'मधील 'हिस्ट्री' तपासणे आवश्यक आहे. सध्या पोलीस हवालदार ठुबे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भामट्यांचा शोध घेतला जात आहे.

 

Comments

No comments yet.