नाशिक (प्रतिनिधी), दि. २२ मार्च २०२६
शहरातील काकड बाग परिसरात एका पाळीव कुत्र्याने नऊ वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कुत्र्याला नियंत्रणात न ठेवल्याचा ठपका ठेवत पंचवटी पोलिसांनी श्वान मालक असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय
काकड बाग येथील कृष्णनगर भागात राहणारे दत्तू शांताराम पोलादे यांची नऊ वर्षांची मुलगी स्वरा ही शुक्रवारी (दि. २०) रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोरून रस्त्याने पायी जात होती. याचवेळी शेजारी राहणाऱ्या रत्ना सुनील मटाले यांच्या मालकीचा पाळीव कुत्रा अचानक स्वराच्या अंगावर धावून गेला. कुत्र्याने स्वराच्या उजव्या हाताचा कडकडून चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे.
हलगर्जीपणा नडला
पाळीव प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी नेताना किंवा घरात ठेवताना त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवणे मालकाची जबाबदारी असते. मात्र, संशयित रत्ना मटाले यांनी आपल्या कुत्र्यावर नियंत्रण न ठेवल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप मुलीचे वडील दत्तू पोलादे यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी मटाले यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस तपास सुरू
या घटनेचा अधिक तपास हवालदार सोर करत आहेत. शहरातील वाढत्या श्वान हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पाळीव प्राण्यांच्या मालकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तडीपारच्या मुसक्या आवळल्या
हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणाºया तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळ्ल्या. भारतनगर भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौफिक हसन शहा (१९ रा.अक्सा मस्जीद जवळ भारतनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. शहा याच्या वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केलेली आहे.
शहर आणि जिह्यातून त्यास सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना शुक्रवारी (दि.२०) रात्री तो आपल्या घरात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी ही कारवाई केली. सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या.
कुठलीही परवानगी न घेता तो घरात मिळून आल्याने त्याच्याविरूध्द हद्दपारी कारवाईचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंमलदार अमित तिडके यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.