भोंदूगिरीचा 'महामेरू'... अशोक खरातची संपत्ती किती? पोलीसही चक्रावले...

Share:
Main Image
Last updated: 21-Mar-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २१ मार्च - 'श्रद्धा' आणि 'भक्ती'च्या नावाखाली सामान्य भाविकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांचा पर्दाफाश होण्याचे सत्र सुरूच आहे. आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने भाविकांच्या भावनांशी खेळणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अफाट संपत्तीचा आकडा समोर आला असून, तपास यंत्रणाही अवाक झाल्या आहेत. अवघ्या ३०० रुपयांचा दगड 'चमत्कारी खडा' म्हणून २ ते ३ लाखांना विकून या महाठगाने नाशिक, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरात ३०० कोटींहून अधिकचे साम्राज्य उभे केल्याचे उघड झाले आहे.

जमिनींचा 'जमीनदार' बाबा!
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने पाथर्डी परिसरात १५० कोटी रुपये किमतीची ३० एकर जमीन खरेदी केली आहे. याशिवाय सिन्नरमधील कहांडळवाडीत ५ कोटींची ४५ एकर जमीन, गौळाणेत ३० कोटींची मालमत्ता आणि १५ मोक्याचे भूखंड त्याच्या नावावर आहेत. शिर्डीच्या पानमळ्यात आणि आसपासच्या परिसरात ७० कोटींच्या जमिनींचे जाळे पसरलेले आहे. मीरगावात १० कोटींचे आलिशान फार्महाऊस आणि अहिल्यानगरात कोट्यवधींचा ५ एकरचा भूखंड, अशी ही बेनामी मालमत्तेची यादी वाढतच आहे.

Advertisement

शहरात बंगले आणि फ्लॅट्सचा सुळसुळाट
केवळ शेतजमीनच नव्हे, तर नाशिकच्या कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा बंगला आणि कॅनडा कॉर्नर सारख्या उच्चभ्रू भागात १ कोटींचे आलिशान ऑफिस खरातने थाटले होते. ओझर विमानतळ, जानोरी आणि दहावा मैल भागातही त्याने मोक्याच्या जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरांत या भोंदू बाबाचे तब्बल ३० फ्लॅट्स आणि अनेक व्यापारी गाळे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भक्तांची लूट आणि महिलांचे शोषण
अशोक खरात केवळ आर्थिक लूट करून थांबला नाही, तर त्याने भक्तीच्या नावाखाली अनेक महिलांच्या अब्रूशी खेळल्याचाही आरोप आहे. 'इशान्येश्वर मंदिर ट्रस्ट'च्या नावाखाली वर्षाला २ कोटींची उलाढाल केली जात होती. मीरगाव येथील त्याच्या घरी धाड टाकली असता लाखोंची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Comments

No comments yet.