भोंदूबाबाचे प्रकरण चाकणकरांना भोवले... राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा...

Share:
Main Image
Last updated: 21-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ मार्च - नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

नेमकं प्रकरण काय?
नाशिक येथील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर खरातचे अनेक धक्कादायक कारनामे उजेडात आले. मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण तेव्हा मिळाले, जेव्हा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि चक्क त्याची 'पाद्यपूजा' करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेच्या प्रमुखच अशा भोंदूबाबाच्या संपर्कात कशा, असा सवाल उपस्थित करत त्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले होते.

Advertisement

मुख्यमंत्र्यांचा आदेश आणि पवारांची भेट
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर चाकणकर यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि आपले राजीनामा पत्र त्यांच्या स्वाधीन केले.

राजीनामा पत्रात काय म्हटले?
रुपाली चाकणकर यांनी आपल्या राजीनाम्यात वादाचा कोणताही उल्लेख टाळत 'वैयक्तिक कारणांचे' निमित्त पुढे केले आहे. पत्रात त्यांनी नमूद केले की:
"मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा सादर करत आहे. आजवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपली ऋणी आहे."

भोंदूगिरी करणाऱ्यांची गय करणार नाही: बावनकुळे
या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, "अशोक खरात प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. अशा पद्धतीचे भोंदू बाबा आश्रम उघडून काय उद्योग करतात, हे अनेकदा पोलिसांच्याही लक्षात येत नाही. मात्र, आता अशा भोंदूगिरी करणाऱ्यांना जेरबंद केले जाईल."

Comments

No comments yet.