मुंबई, (प्रतिनिधी) २१ मार्च - मुंबई सीमा शुल्क विभाग-३ च्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रभर चाललेल्या एका थरारक कारवाईत अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. १७ मार्च २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत अधिकार्यांनी ६४.३९४ किलो 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त केला असून, त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य अंदाजे ६४ कोटी ३९ लाख रुपये इतके आहे.
अशी झाली कारवाई:
प्रगत प्रवासी सूचना प्रणाली (APIS) आणि स्पॉट प्रोफाइलिंगच्या आधारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बँकॉकहून येणाऱ्या चार संशयास्पद प्रवाशांवर अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती. हे प्रवासी विमानतळावर उतरताच त्यांना अडवून त्यांची झडती घेण्यात आली. या वेळी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा आढळून आला.
तस्करीची 'नवी पद्धत' उघड:
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक परदेशी नागरिक आहे. अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्याची वाहतूक करण्यासाठी आता तस्कर परदेशी नागरिकांचा वापर करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. तस्करांनी अवलंबलेली ही नवी कार्यपद्धती पाहून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या चौघांनाही नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
विमानतळ प्रशासनाची मोठी कामगिरी:
चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) १८ मार्च २०२६ पर्यंत, मुंबई विमानतळ आयुक्तालयाने तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. आतापर्यंत:
एकूण गुन्हे: २४४ प्रकरणे दाखल.
जप्त मुद्देमाल: १,३३० किलोपेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा.
एकूण अटक: २८६ व्यक्तींना कोठडी.
विमानतळ प्रशासनाने राबवलेल्या या कठोर उपाययोजनांमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, मुंबई सीमा शुल्क विभाग अंमली पदार्थांच्या विरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.