भोंदू अशोक खरात प्रकरण... राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया...

Share:
Main Image
Last updated: 20-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० मार्च - 'भोंदूगिरी' आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी अशोक खरात याच्यासह त्याला साथ देणाऱ्यांवर आणि यामागे असलेल्या सर्व सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

भोंदूगिरीचा प्रकार अतिशय घृणास्पद - प्रफुल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या प्रकरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, "भोंदूबाबांचे जे काही प्रकार समोर येत आहेत, ते अतिशय वाईट आणि घाणेरडे आहेत. अशोक खरातवर सक्त कारवाई झालीच पाहिजे, पण त्याच्यासोबत असलेल्या लोकांचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे जोडली जात आहेत, त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही योग्य ती कायदेशीर पावले उचलणार आहोत. येणाऱ्या काळात आमची ही कृती सर्वांना दिसेलच."

Advertisement

पीडितांनी घाबरू नये, समोर येऊन तक्रार करावी - सुनील तटकरे
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणातील माहिती उद्विग्न करणारी असल्याचे म्हटले आहे. "श्रद्धेच्या नावाखाली असे प्रकार घडतील, अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना अनेकांशी संपर्क येतो, मात्र याचा अर्थ असा नाही की गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याला पाठिंबा दिला जाईल. आमचे सरकार या प्रकरणात ठाम असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, ज्या पीडित महिला आहेत, त्यांनी न घाबरता समोर येऊन पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तपासासाठी पक्षीय पातळीवरही पावले उचलणार
या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकमधील या धक्कादायक प्रकारामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत असून, आता पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.