येवला, (प्रतिनिधी) २० मार्च - राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरसुल तारुर (तळवडे) रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे क्रॉसिंग क्र. १० येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे अंडरपास (RUB) संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी उपाय म्हणून विद्यमान रस्ता पूर्णपणे बंद न करता नगरसुल तारुर (तळवडे) अंडरब्रिज येथे RCC रिटेनिंग वॉल उभारण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात अंडरपास मध्ये माती धसन्याचे घटना टाळून येथील वाहतूक सुरळीत राहील. परिसरातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दळणवळणासाठी ही मोठी सोय होणार आहे.
याबाबत महाव्यवस्थापक दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांच्या वतीने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दि.१ डिसेंबर २०२५ रोजी पत्र पाठविले आहे. नगरसुल तारुर (तळवडे) रेल्वे स्थानकांदरम्यान अंडरब्रिजचे काम बहुतांश पूर्ण झाले होते. मात्र संरक्षण भिंतीचे काम प्रलंबित ठेवण्यात आल्यामुळे पावसाळ्यात अंडरपास मध्ये मातीचा शिरकाव होऊन वाहतूक खंडित होत होती. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी उपाय म्हणून विद्यमान रस्ता पूर्णपणे बंद न करता RCC रिटेनिंग वॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे स्थानिकांना होणारा मोठा त्रास वाचणार आहे. या कामामुळे पावसाळ्यात मातीचा शिरकाव होण्याची समस्या कायमची संपुष्टात येणार असून नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. तसेच वाहतुकीवर कोणताही मोठा परिणाम न होता हे काम पूर्ण केले जाणार आहे. सदर काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रतिक्रिया
नगरसूल-तारुर (तळवडे) दरम्यान रेल्वे अंडरब्रिज येथे पावसळ्यात माती रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांची वाहतुकीस गैरसोय होऊ नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याबाबत रेल्वे विभागाला प्रस्तावित केले होते. त्यानुसार याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यास मंजूरी मिळाली असून सदर काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नागरिकांच्या हितासाठी पावसाळ्यापूर्वी शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
- समीर भुजबळ, माजी खासदार