मुलांच्या खेळण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग... सोसायटीच्या पार्किंगमध्ये वादाचा थरार..

Share:
Main Image
Last updated: 20-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - सोसायटीच्या पार्किंगमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी आणि विनयभंगात झाल्याची धक्कादायक घटना पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगर भागात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एकाच कुटुंबातील तीन संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर घोडके, ऐश्वर्या घोडके आणि अक्षय घोडके (सर्व रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

Advertisement

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित हे एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये लहान मुले खेळत होती. यावेळी पीडितेची मुलगी फुटबॉल खेळत असताना चेंडू संशयितांना लागला. यावरून संशयितांनी लहान मुलीस शिवीगाळ करत मारहाण केली.

आपल्या मुलीला मारहाण का करता, असे विचारण्यासाठी पीडित महिला संशयितांकडे गेली असता, सुधाकर घोडके याने त्यांना दमदाटी केली. वादादरम्यान संशयिताने पीडितेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हवालदार देवरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet.