नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - शहरात घरफोडी करणाऱ्या भामट्यांनी आता उघड्या घरांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. दिंडोरी नाका परिसरात एका खासगी नोकरदाराचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरट्यांनी पळवला, तर अंबड औद्योगिक वसाहतीतील एका घटनेत तब्बल ७ लाख ५९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहाटेच्या सुमारास हॉलमधून लॅपटॉप चोरी (पंचवटी)
पहिली घटना दिंडोरी नाका येथील अरुणा सोसायटीत घडली. येथील रहिवासी प्रणव प्रकाश शहा हे गेल्या २२ ऑक्टोबर रोजी रात्री लॅपटॉपवर काम करत होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी लॅपटॉप आणि मोबाईल हॉलमध्येच ठेवला आणि ते झोपी गेले. सकाळी त्यांची आई घराचा दरवाजा लोटून जैन मंदिरात गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. अवघ्या काही वेळात चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार सागर कुलकर्णी तपास करीत आहेत.
स्वयंपाकघरातील डब्यातून साडे सात लाखांची चोरी (अंबड)
दुसरी धाडसी चोरी अंबड औद्योगिक वसाहतीतील कृष्णनगर भागात घडली. येथील साईशिव संकुलमध्ये राहणाऱ्या प्रतिभा संदीप सोनवणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. ११) सोनवणे कुटुंबातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त असताना चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी थेट स्वयंपाकघरात शिरून तेथील डब्यात ठेवलेली रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा ऐवज हातोहात लांबवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाडवी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नागरिकांना आवाहन:
दिवसेंदिवस वाढणाऱ्या या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत किंवा कामात असताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.