सातपूरच्या 'बारागाड्या' उत्सवात चोरट्यांचा डल्ला... दोन महिलांचे दागिने लांबवले...

Share:
Last updated: 20-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - गुढीपाडव्यानिमित्त त्र्यंबक रोडवरील सातपूर गावात भरलेल्या यात्रेत आणि बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात चोरट्यांनी हातसफाई केली आहे. गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे ५४ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्रे अज्ञात भामट्यांनी हातोहात लांबवली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृणाल विशाल सूर्यवंशी (रा. महाराष्ट्र हौ. सोसायटी, सातपूर कॉलनी) या गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सातपूर गावात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. देवदर्शन उरकून त्या कमानीजवळ कार्यक्रम बघत उभ्या असताना, प्रचंड गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले.

Advertisement

एकाच ठिकाणी दोन महिलांना लक्ष्य
चोरट्यांनी याच ठिकाणी दुसरी शिकारही केली. ज्ञानेश्वरी कल्पेश रोकडे (रा. साईरत्न चौक, श्रमिकनगर) यादेखील उत्सव पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याही गळ्यातील २७ हजार रुपयांचे मंगळसूत्र भामट्यांनी लंपास केले. दोन्ही घटनांमध्ये एकूण ५४ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हवालदार दीपक खरपडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet.