काळ बनून आली 'सिटीलिंक' बस... सायकलस्वार चिमुरड्याला उडवले...

Share:
Main Image
Last updated: 20-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - शहरातील किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरात भरधाव सिटीलिंक बसने दिलेल्या धडकेत १२ वर्षीय सायकलस्वार बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत नागोजी गवळी (१२, रा. श्रीजी हाईट्स, जुईनगर) असे मृत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संकेत गवळी आणि त्याचा मित्र आर्यन संदीप वाघमारे हे दोघे बुधवारी (दि. १८) दुपारी किशोर सूर्यवंशी मार्गावरून सायकलने जात होते. समर्थ मेडिकल स्टोअर्ससमोरून ते डबलसीट सायकलवर प्रवास करत असताना, विरुद्ध दिशेने अत्यंत वेगात आलेल्या सिटीलिंक बसने (क्रमांक MH 15 GV 7944) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सायकलला उडवल्यानंतर बस

Advertisement
पुढे जाणाऱ्या एका झायलो कारवर जाऊन आदळली.

उपचारादरम्यान मृत्यू

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातात दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने पंचवटीतील आयुष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी उपचारादरम्यान संकेतची प्राणज्योत मालवली. डॉ. मनिष आमोदकर यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. दुसरा जखमी बालक आर्यन वाघमारे याची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मृत मुलाचे वडील नागोजी गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी अज्ञात बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक मद्रुपकर या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सिटीलिंक बसच्या वाढत्या अपघातांमुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Comments

No comments yet.