मुंबई, (प्रतिनिधी) २० मार्च - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले असून, आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकचा कथित ज्योतिषी आणि भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या चौकशीची मागणी केली आहे. खरातचा या अपघाताशी काही संबंध आहे का, याची सखोल तपासणी व्हावी, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमका आरोप?
नाशिकमध्ये महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खरात एका खासगी विमान कंपनीच्या पायलटसोबत दिसत आहे. याच कंपनीचे विमान अजित पवार यांच्या प्रवासासाठी वापरले जात होते. या फोटोचा दाखला देत मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "अशोक खरातचे विमान कंपनीच्या पायलट्सशी काय संबंध होते? अजित दादांच्या अपघातामागे या भोंदू बाबाचा काही हात तर नाही ना?"
घातपाताचा संशय कायम
अमोल मिटकरी यांनी सुरुवातीपासूनच हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी यापूर्वी विमानाचा ५० कोटींचा विमा, पायलटने विमानात केलेले बदल आणि घटनास्थळी सापडलेले पुरावे यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता अशोक खरातच्या अटकेनंतर मिटकरींनी या प्रकरणाचा तपास नवीन कोनातून करण्याची मागणी केली आहे. मिटकरींच्या मते, दादांच्या निधनापूर्वी त्यांच्या निवासस्थानाबाहेर काही अघोरी प्रथा किंवा करणी-बाधेसारखे प्रकार करण्याचा प्रयत्न झाला होता, ज्यामागे खरातचा हात असू शकतो.
राजकीय वर्तुळात खळबळ
अशोक खरात याला बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात १८ मार्च रोजी अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे अनेक नेत्यांची उठबस असल्याचे उघड झाल्याने आधीच राजकारण तापले आहे. त्यातच मिटकरींनी थेट अजित पवारांच्या अपघाताशी त्याचा संबंध जोडल्याने तपास यंत्रणांवर आता मोठा दबाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी आता सरकार आणि पोलीस काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.