स्टॅम्प पेपरसाठी जादा पैसे मागणे महागात...  शासकीय स्टॅम्प व्हेंडर जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 20-Mar-2026

जालना, (प्रतिनिधी) २० मार्च - शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्प पेपरसाठी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त पैशांची मागणी करून लाच स्वीकारणाऱ्या एका अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी रंगेहात पकडले. श्रीकांत मोहनराव बनसोड (वय ७०, रा. वर्धमान रेसिडेन्सी, गंगापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित लोकसेवकाचे नाव आहे. या कारवाईमुळे गंगापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?
​तक्रारदाराला शैक्षणिक कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती. त्यांनी १३ मार्च रोजी गंगापूर येथील 'एस. एम. बनसोड' या अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याकडून ५०० आणि १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर विकत घेतले होते. मात्र, त्या वेळी त्यांच्याकडून जास्त पैसे आकारण्यात आले होते. पुन्हा १६ मार्च रोजी तक्रारदार ५०० रुपयांचे १० स्टॅम्प पेपर घेण्यासाठी गेले असता, संशयित श्रीकांत बनसोड यांनी ५०० रुपयांच्या एका स्टॅम्पसाठी ५५० रुपये प्रमाणे एकूण ५,५०० रुपयांची मागणी केली. ​शासकीय किमतीपेक्षा अधिकचे ५०० रुपये ही लाचच असल्याचे खात्री पटल्यानंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्याकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली.

Advertisement

​सापळा आणि अटक
​तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या पथकाने १६ मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत बनसोड यांनी ५,५०० रुपये स्वीकारण्याची संमती दर्शवली. त्यानंतर दुपारी गंगापूर येथील त्यांच्या दुकानात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेच्या ५०० रुपयांसह एकूण ५,५०० रुपये स्वीकारताच पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने बनसोड यांना ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एक मोबाईल आणि ५,५०० रुपये मिळून आले. यामध्ये ५,००० रुपये स्टॅम्पची मूळ किंमत असून ५०० रुपये लाचेची रक्कम असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​यांनी केली कारवाई
​ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, सहाय्यक सापळा अधिकारी कोमल शिंदे, अंमलदार आतिश तिडके, गजानन खरात, अशोक राऊत, गजानन कांबळे आणि चालक भालचंद्र बिनोरकर यांचा समावेश होता.

​एसीबीचे आवाहन:
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने किंवा खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्याशी संपर्क साधावा.
​टोल फ्री क्रमांक: १०६४
​भ्रमणध्वनी: ९७६४०२१०६४ / ९८८१४६३३६५
​ईमेल: dysp.acbjalna@mahapolice.gov.in

Comments

No comments yet.