काळजाचा थरकाप... आडगाव-म्हसरूळ रोडवर 'छोटा हत्ती'ची दुचाकीला धडक... तरुण ठार...

Share:
Main Image
Last updated: 19-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ मार्च - शहरातील आडगाव-म्हसरूळ लिंकरोडवर शनिवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात ३१ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव येणाऱ्या एका 'छोटा हत्ती' मालवाहू टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीनाथ रामदास टोंगारे (वय ३१) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृत गोपीनाथ यांची बहीण कविता योगेश बेंडकुळे (रा. वरवंडी, ता. दिंडोरी) यांनी फिर्याद दिली आहे.

समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ७) दुपारी १ वाजेच्या सुमारास गोपीनाथ टोंगारे हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून म्हसरूळकडून आडगावच्या दिशेने जात होते. आडगाव-म्हसरूळ लिंकरोडवरील 'सुरती फरसान' दुकान परिसरात ते आले असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या छोटा हत्ती (एमएच १५ जेसी ०८७१) या मालवाहू टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Advertisement

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
या धडकेत गोपीनाथ हे दुचाकीवरून फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ऐन विशी-तिशीतील तरुणाचा अशा अपघाती मृत्यूने टोंगारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. म्हसरूळ पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदवला असून हवालदार खराटे पुढील तपास करत आहेत.

आडगाव-म्हसरूळ लिंकरोडवर वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांनी वेगावर मर्यादा ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जेलरोडला तरुणाची आत्महत्या
नाशिक : जेलरोड भागात राहणाºया २२ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संकेत किशोर पगारे (२२ रा.शिवशक्तीनगर जेलरोड) असे मृत युवकाचे नाव आहे. पगारे याने बुधवारी (दि.१८) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील रूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल किशोर पगारे यांनी त्यास तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. श्रीनल पाटील यांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. हवालदार देवरे तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.